ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

नागावमध्ये बिबट्याचा कहर : वस्तीजवळ अचानक दर्शन, पाच जणांवर हल्ला

वनविभाग आणि पोलिसांकडून बिबट्याला सुरक्षित पकडण्याचे प्रयत्न सुरू 


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

अलिबाग : अलिबाग तालुक्यात बिबट्याच्या दर्शनाने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागाव येथील नागरी वस्तीमध्ये आज सकाळी बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याने दोन जणांवर हल्ला करून त्यांना जखमी केल्यानंतर  दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास रेस्क्यू टीम मधील अन्य तिघा जणांना त्याने जखमी केले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील एका वाडीत बिबट्या लपून असल्याचे समोर आल्यानंतर वनविभागाकडून त्याला सुरक्षितपणे पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
बिबट्याला दुपारी रेस्क्यू करताना रेस्क्यू टीम मधील तिघेजण जखमी झाले आहेत. त्यामध्ये एका वन विभागातील अधिकाऱ्याचा समावेश आहे.
नागरीकांनी घराबाहेर अनावश्यक हालचाल टाळावी, सुरक्षित ठिकाणी राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असले तरी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे. नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर यांनी नागरिकांना अफवा न पसरवता वनविभागाला सहकार्य करण्याचे तसेच अनावश्यक गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. बिबट्याच्या उपस्थितीमुळे परिसरात तणाव असला, तरी वनविभाग आणि पोलिसांचे पथक संयुक्तरीत्या मोहिम राबवत असल्याने परिस्थिती लवकरच सामान्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
…..

Related Articles

Back to top button