ताज्या बातम्या
विठ्ठल भक्तीला मानाचा मुजरा; अलिबागच्या ज्येष्ठ भजनकारांचा आरसीएफकडून गौरव

महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला उजाळा देणाऱ्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने, मैफिल अलिबाग या संस्थेच्या वतीने आणि आरसीएफ कुरूळ वसाहतीच्या सहकार्याने एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात अलिबाग परिसरातील ज्येष्ठ व अनुभवी भजनी कलाकारांचा सन्मान करण्यात आला.
शनिवार, ५ जुलै रोजी झालेल्या या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले आरसीएफचे कार्यकारी संचालक (थळ) नितीन हिरडे यांचे प्रमुख उपस्थितीत, त्यांच्या सुविद्य पत्नी मिनल हिरडे यांच्या सान्निध्यात पार पडलेले कलाकारांचा सन्मान सोहळा.
अलिबाग परिसरात अनेक दशके कार्यरत असलेल्या भजनी मंडळांच्या माध्यमातून विठ्ठल भक्तीची परंपरा जोपासणाऱ्या आणि इतरांना प्रेरणा देणाऱ्या वयोवृद्ध भजनी कलाकारांच्या संगीत सेवेची दखल घेत, त्यांना शाल, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सन्मानित कलाकारांमध्ये प्रमुखतः –
हरिश्चंद्रबुवा लोणारकर (वय ९६, भाल), रमेशबुवा नाईक (वरसोली), रमेशबुवा खंडागळे (घोटवडे), गोपाळबुवा भिडे (किहीम), शंकरबुवा पाटील (ढवर), तुळशीदासबुवा पवार (पेझारी), सुरेशबुवा गुरव (थळ), गणेशबुवा पडते (गुंजीस), विजयबुवा काठे (थळ), गजाननबुवा दाते (थळ), दामोदर म्हात्रे (वायशेत), श्रीधरबुवा पाटील (पेझारी), रमेश पाटील (नवेदर बेली), यशवंत आठवले (चौल) यांचा समावेश होता.
काही ज्येष्ठ कलाकार – महादेवबुवा वारगे (बेलोशी), कृष्णबुवा पाटील (सारळ), मधुसूदनबुवा ठाकूर (फोफेरी) – वैयक्तिक कारणास्तव अनुपस्थित राहिले.
सन्मानानंतर कार्यक्रमात एक संगीतमय पर्वणी अनुभवायला मिळाली. सुप्रसिद्ध शास्त्रीय व भक्तिसंगीत गायिका सायली तळवलकर आणि गायक नागेश आडगावकर यांच्या ‘तीर्थ विठ्ठल’ या भक्तिरसपूर्ण सादरीकरणाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमास सौ. अर्चना हरळीकर, महाव्यवस्थापक सुधीर कोळी व सौ. सुजाता कोळी, महाव्यवस्थापक मगेश व सौ. मगेश, तसेच परिसरातील संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीधरबुवा पाटील यांनी सन्मानित कलाकारांच्या वतीने मनोगत व्यक्त करत आरसीएफ व्यवस्थापन व मैफिल अलिबाग यांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उदय जोशी यांनी सुरेख पद्धतीने पार पाडले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी भक्ती, संगीत आणि सन्मान यांचा एक सुंदर संगम अनुभवायला मिळाला, ज्याने परिसरातील सांस्कृतिक वातावरण अधिक समृद्ध केले.