ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

“विठू माउलीच्या दिंडीत आता संरक्षणाची पताका” घाटमाथ्यावर जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी रिफ्लेक्टर जॅकेट्सचा अभिनव उपक्रम; ‘भक्तीबरोबर सुरक्षितताही’चा संदेश


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

अलिबाग  |
मुंबई–पुणे जुन्या महामार्गावरून घाटमाथ्याकडे निघालेली दिंडी म्हणजे विठू माउलीच्या नामाचा अखंड गजर आणि परंपरेचा उत्सव. मात्र वळणावळणाचे रस्ते, तीव्र चढ-उतार, धुकं आणि भरधाव वाहने यामुळे हा भक्तीचा प्रवास अनेकदा धोकादायक ठरतो. विशेषतः पहाटे आणि रात्रीच्या वेळी वाहनचालकांना रस्त्यावर चालणारे वारकरी नीट दिसत नसल्याने अपघातांची शक्यता कायम असते.
याच पार्श्वभूमीवर खालापूर तालुक्यातील चौक–टेंबरी गावातून शनि शिंगणापूरकडे निघालेल्या दिंडीसाठी एक वेगळा आणि जीवनरक्षक उपक्रम राबवण्यात आला. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था (हेल्प फाउंडेशन) यांच्या माध्यमातून धनंजय गीध यांच्या पुढाकाराने दिंडीत सहभागी प्रत्येक वारकऱ्याला रिफ्लेक्टर सेफ्टी जॅकेट, कॅप आणि सिग्नल बॅटन देण्यात आले.
घाटातील अंधाऱ्या वळणांवर आणि कमी दृश्यता असलेल्या मार्गांवर हे रिफ्लेक्टर जॅकेट्स दूरवरून चमकून वाहनचालकांना वारकऱ्यांची उपस्थिती जाणवणार आहे. त्यामुळे अपघात टाळण्यास मोठी मदत होणार असून, दिंडीचा प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे.
हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर यांनी सांगितले की, वारीत अन्नदानाची परंपरा जुनी आहे; मात्र आजच्या काळात जीवितरक्षणासाठी सुरक्षा साहित्य देणे हीही तितकीच मोठी सेवा आहे. श्रद्धेला सुरक्षिततेची जोड दिल्यास अनेक अपघात टाळता येऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले.
दिंडी प्रमुखांनीही मनोगत व्यक्त करताना सांगितले की, अनेक वर्षे दिंडीत सहभागी होताना अन्नदान अनुभवले; पण वारकऱ्यांच्या जीवितासाठी सुरक्षा साधने देण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. पुढे सर्व सुरक्षा नियम पाळूनच दिंडी काढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या उपक्रमात गुरुनाथ साठेलकर, धनंजय गीध, अमोल कदम, महेश भोसले, पंकज बागुल आणि ऋषिकेश विश्वकर्मा यांचा सक्रिय सहभाग होता. महामार्ग पोलीस आणि आरटीओ विभागालाही या उपक्रमातून सहकार्य होणार असून, समाज आणि प्रशासनाच्या समन्वयातून अपघातमुक्त दिंडीचा आदर्श निर्माण होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला.
भक्तीच्या परंपरेला आधुनिक जबाबदारीची जोड देत वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उचललेले हे पाऊल आता इतर दिंडींसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.
नामाच्या गजरात चालणारी वारी आता संरक्षणाच्या कवचात पुढे सरकत आहे.

Related Articles

Back to top button