ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

विकासाला शब्द नव्हे, कामांची साथ-अक्षया नाईक यांच्या हस्ते सिद्धार्थनगरात पायाभूत सुविधांचा आरंभ


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

अलिबाग : प्रशासन काळात रखडलेल्या विकासकामांना अखेर गती मिळू लागली असून, अलिबाग शहरात काम बोलू लागले आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्ष अक्षया नमिता प्रशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग नगरपरिषद अ‍ॅक्शन मोडमध्ये आली असून, सिद्धार्थनगर परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर पेव्हरब्लॉक बसवणे व गटार बांधकामाच्या कामांचा शुभारंभ करून शहराच्या विकासाला ठोस सुरुवात करण्यात आली आहे.
या शुभारंभ प्रसंगी नगरसेवक ॲड. नीलम हजारे, अनिल चोपडा तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक वर्षांपासून रस्त्यांची दुरवस्था, पावसाळ्यात पाणी साचणे आणि गटार व्यवस्थेचा अभाव यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. या कामांमुळे परिसरातील दैनंदिन अडचणी दूर होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
नगरपरिषदेच्या निवडणुका होण्यापूर्वी संपूर्ण कारभार प्रशासनाच्या हातात असल्याने शहरातील विविध विकासकामे खोळंबली होती. मात्र आता अलिबाग नगरपरिषद वर शेतकरी कामगार पक्षाची सत्ता स्थापन झाल्यानंतर रखडलेली कामे मार्गी लावण्याचा निर्धार प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. पदभार स्वीकारताच नगराध्यक्ष अक्षया नाईक यांनी केवळ आश्वासनांपुरते न थांबता थेट कामांना सुरुवात करून आपली विकासाभिमुख भूमिका स्पष्ट केली आहे.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष अक्षया नाईक म्हणाल्या की, “अलिबाग शहरातील प्रत्येक प्रभागाचा समतोल विकास हेच आमचे ध्येय आहे. प्रशासन काळात थांबलेली सर्व विकासकामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील. रस्ते, गटार, पाणीपुरवठा आणि स्वच्छता या मूलभूत सुविधा सक्षम करण्यावर आमचा भर राहील.”
सिद्धार्थनगर येथील या कामांमुळे परिसराचा चेहरामोहरा बदलणार असून सुरक्षित, स्वच्छ आणि सुस्थित रस्त्यांमुळे नागरिकांचे जीवनमान उंचावणार आहे. स्थानिक नागरिकांनीही नगराध्यक्ष अक्षया नाईक यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या विकासकामांचे स्वागत करत, “आता अलिबागमध्ये खऱ्या अर्थाने विकास सुरू झाला आहे” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
एकूणच, अलिबाग शहरात विकासाला नवी दिशा मिळत असून, नगराध्यक्ष अक्षया नाईक यांच्या नेतृत्वाखाली रखडलेली कामे मार्गी लावण्याचा संकल्प प्रत्यक्षात साकार होत असल्याचे चित्र शहरात दिसू लागले आहे.

Related Articles

Back to top button