वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही संधी; महाराष्ट्र पोलीस दलात तब्बल १५ हजार भरती

मुबंई : महाराष्ट्रातील हजारो तरुणांना पोलीस दलात सेवा करण्याची नवी संधी उपलब्ध होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी २०२४-२५ या वर्षातील पोलीस शिपाई संवर्गातील सुमारे १५ हजार पदभरतीस मंजुरी दिली. विशेष बाब म्हणजे, २०२२ व २०२३ मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एकदाच अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनेक उमेदवारांची आशा पुन्हा जागी झाली आहे.
भरती प्रक्रियेत पोलीस शिपाई, चालक, बॅण्डस् मॅन, सशस्त्री शिपाई आणि कारागृह शिपाई अशी विविध पदे समाविष्ट आहेत. सर्व पदांसाठी ओएमआर पद्धतीवर आधारित लेखी परीक्षा घेण्यात येईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, भरतीसाठी अर्ज स्वीकृतीपासून ते शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेपर्यंतची सर्व जबाबदारी अतिरिक्त पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) यांच्याकडे सोपविण्यात आली.
राज्याच्या कायदा-सुव्यवस्था यंत्रणेसाठी शिपाई संवर्ग हा कणा मानला जातो. न्यायालयीन निर्देश, लोकप्रतिनिधींचा दबाव आणि वाढत्या रिक्त पदांमुळे सरकारने ही भरती गतीने करण्याचा निर्णय घेतला आहे.