क्रीडाताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

“वंदे नारीशक्ती! भारतीय महिलांचा विश्वचषकावर सुवर्ण विजय” रणरागिनींनी  दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी नमवले 


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

नवी मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघानं इतिहास रचत पहिल्यांदाच आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करून भारताने विश्वविजेतेपदावर मोहोर उमटवली. या विजयाने संपूर्ण देशात जल्लोषाचा माहोल आहे.
दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. भारतानं 299 धावांचं लक्ष्य उभारलं. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा डाव 246 धावांवर आटोपला. भारताकडून दीप्ती शर्माने 9.3 षटकांत 39 धावांत 5 विकेट्स घेतल्या, तर शेफाली वर्माने दोन बळी घेतले. यापूर्वी फलंदाजीत शेफालीने 87, दीप्तीने 58, स्मृती मंधानाने 45 तर ऋचा घोषने 34 धावा करून भारताचा डाव उभारला. दक्षिण आफ्रिकेकडून खाकाने 3 विकेट्स घेतल्या.
सामना सुरू होण्यापूर्वी नवी मुंबईत पावसामुळे चाहत्यांमध्ये थोडीशी चिंता होती; मात्र ठरलेल्या वेळेत सामना सुरू झाला. मैदानावर गायिका सुनिधी चौहानने राष्ट्रगीत सादर करत वातावरण भारून टाकले.
विजय सोहळा होणार का? बीसीसीआयचे म्हणणे
2024 मध्ये पुरुष संघाने टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर भव्य विजय परेड काढण्यात आली होती. त्याप्रमाणेच महिला संघाचा विजय सोहळा होणार का, याची उत्सुकता व्यक्त होत आहे. याबाबत बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी सांगितले की,
> “सध्या विजय परेडची कोणतीही योजना नाही. मी आयसीसी बैठकीसाठी दुबईला जात आहे. मी परतल्यानंतरच पुढील नियोजन केले जाईल.”
तसंच त्यांनी 2025 पुरुष आशिया कप ट्रॉफी भारताला अद्याप मिळालेली नसल्याने ती योग्य सन्मानाने भारतात परत आणण्याबाबत आयसीसीकडे मुद्दा उपस्थित करण्याची माहिती दिली.
भारतीय महिला संघाची कामगिरी
वन डे विश्वचषकाच्या इतिहासात भारताची ही तिसरी अंतिम फेरी होती.
• 2005 – उपविजेते
• 2017 – उपविजेते
• 2025 – विजेते (पहिलं विजेतेपद)
एकदिवसीय सामने: 310
• विजय – 168 | पराभव – 136 | बरोबरी – 2 | अनिर्णित – 4
टी-20 सामने: 191
• विजय – 104 | पराभव – 80 | बरोबरी – 1 | अनिर्णित – 6
आशिया कप (ODI): 4 विजेतेपदे
टी-20 आशिया कप: 3 विजेतेपदे
राष्ट्रकुल 2022: रौप्य पदक
आशियाई क्रीडा स्पर्धा 2022: सुवर्णपदक
भारतीय महिला संघाने दीर्घ वाटचालीतून हे ऐतिहासिक यश मिळवलं असून, आता या विजय सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button