क्रीडाताज्या बातम्यादेश विदेशमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईरायगड

रॉजर फेडरर : ट्रॉफींपेक्षा मोठा ठरलेला माणुसकीचा विजय


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम / डिजिटल रिसर्च टीम 

जगाने रोजर फेडररला टेनिसच्या कोर्टवर बादशाह म्हणून पाहिलं, पण त्याच्या आयुष्याची खरी कहाणी ट्रॉफींपलीकडे जाते. स्वित्झर्लंडमध्ये जन्मलेला हा मुलगा जेव्हा लहानपणी आईसोबत दक्षिण आफ्रिकेत जायचा, तेव्हा त्याच्या डोळ्यांसमोर एक वेगळीच दुनिया उभी राहायची. काही मुलांकडे शाळा नव्हती, पुस्तकं नव्हती, स्वप्नांना पंख देणाऱ्या संधी नव्हत्या. त्या वेळी त्याच्या आईने त्याला एक साधं पण आयुष्य बदलून टाकणारं वाक्य सांगितलं “मोठं झालास की लोकांचं जीवन सोपं कर.” हे शब्द त्याच्या मनात कायमचे कोरले गेले.

काळ पुढे सरकत गेला. रोजर फेडरर जगातील क्रमांक एकचा टेनिसपटू बनला. त्याने २० ग्रँडस्लॅम जिंकले, सलग अनेक वर्षे अव्वल स्थान गाजवलं आणि कोट्यवधी चाहत्यांच्या हृदयात घर केलं. पैसा, प्रसिद्धी, गौरव सगळं काही त्याच्या पायाशी होतं. पण या यशाने त्याला कधीही मूळ विसरू दिलं नाही. त्याला आठवत राहिली ती आफ्रिकेतील निरागस डोळ्यांची मुलं.

याच जाणिवेतून त्याने रॉजर फेडरर फाउंडेशन  स्थापना केली. ही केवळ एक संस्था नव्हती, तर लाखो मुलांच्या आयुष्यात उजेड पेरणारी चळवळ होती. या फाउंडेशनच्या माध्यमातून तब्बल २५ लाख मुलांना शिक्षणाची संधी मिळाली, तर 60  हजार शिक्षकांना प्रशिक्षण आणि आधार मिळाला. शाळा उभ्या राहिल्या, वर्ग सुरू झाले, स्वप्नांना दिशा मिळाली. फेडररने कधीही स्वतःच्या नावाचा गाजावाजा केला नाही; अनेक शिष्यवृत्ती त्याने मुलांच्या नावाने सुरू केल्या. त्याच्यासाठी हा खरा विजय होता.

रोजर फेडररच्या रॉजर  फेडरर  फाउंडेशन संदर्भात एक कमी चर्चेत आलेला पण अधिकृत उल्लेख असलेला किस्सा असा सांगितला जातो. दक्षिण आफ्रिकेत एका शैक्षणिक प्रकल्पाच्या भेटीदरम्यान फेडररने औपचारिक भाषण किंवा फोटोसेशन आटोपल्यावर थेट वर्गात जाऊन मुलांबरोबर जमिनीवर बसून वाचन सत्रात भाग घेतला. नियोजित कार्यक्रम संपल्यानंतरही तो जवळपास तासभर शिक्षकांशी अभ्यासक्रम, स्थानिक भाषेतील शिक्षण आणि शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या अडचणींवर चर्चा करत राहिला. फाउंडेशनच्या अहवालांमध्ये नमूद केल्याप्रमाणे, त्याची भूमिका केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नसून “गुणवत्तापूर्ण शिक्षण” या संकल्पनेवर भर देण्याची आहे. म्हणूनच तो प्रकल्पांची प्रगती प्रत्यक्ष पाहतो, शिक्षक प्रशिक्षणावर विशेष लक्ष देतो आणि दीर्घकालीन परिणाम मोजण्यावर आग्रह धरतो. हा प्रसंग मोठ्या मीडियात झळकला नसला, तरी फेडररच्या कार्यपद्धतीतील संवेदनशीलता आणि वैयक्तिक बांधिलकी अधोरेखित करणारा अधिकृतरीत्या नोंदवलेला भाग मानला जातो.

२००४ च्या त्सुनामीसारख्या भयंकर आपत्तीमध्येही तो मदतीसाठी पुढे सरसावला. भूकंप असो किंवा इतर संकटं, फेडररने नेहमीच मानवतेच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या कार्याची दखल घेत युनाइटेड नेशन्सने त्याची ‘गुडविल पीस अॅम्बेसेडर’ म्हणून नियुक्ती केली. जगभर शांतता आणि शिक्षणाचा संदेश देणारा तो केवळ खेळाडू राहिला नाही, तर एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व बनला.

एका कार्यक्रमात दोन अनाथ मुलींनी त्याला पाहून सांगितलं “आम्हाला कोणी सोडलं हे आठवत नाही, पण आम्हाला कोणी वाचवलं हे आठवतं… ते म्हणजे रोजर फेडरर.” त्या क्षणी त्याच्या डोळ्यांत आलेले अश्रू हे कोणत्याही ट्रॉफीपेक्षा मौल्यवान होते. त्याने जिंकलेल्या प्रत्येक विजेतेपदापेक्षा हा मानवी स्पर्श त्याच्यासाठी मोठा ठरला.

‘जिजू’ नावाच्या एका लहान मुलाने एकदा सहा वर्षांचा असताना त्याला सांगितलं होतं, “मला तुमच्यासोबत खेळायचं आहे.” फेडररने तेव्हा हसून ऐकलं, पण निवृत्तीपूर्वी त्याला दिलेला शब्द विसरला नाही. अकरा वर्षांचा झाल्यावर त्या मुलाला खास बोलावून त्याच्यासोबत सामना खेळला. एका छोट्या चाहत्याचं स्वप्न पूर्ण करताना त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं. महानता केवळ विक्रमांत नसते, ती हृदयात असते.

रोजर फेडररने आयुष्यात अमाप पैसा कमावला, असंख्य ट्रॉफी जिंकल्या; पण त्याहून मोठं म्हणजे त्याने मनं जिंकली. २५ लाख मुलांच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश पेरणारा हा महानायक जगासाठी एक जिवंत संदेश आहे यश मिळवणं मोठं असतं, पण त्या यशातून इतरांचं जीवन उजळवणं त्याहून मोठं असतं.

….


Related Articles

Back to top button