क्रीडाताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड
रिलायन्स मैदानात तरुण क्रिकेटचा महासंग्राम—कूच बिहार ट्रॉफीला धमाकेदार सुरुवात, महाराष्ट्र विरुद्ध ओडिशाची भिडंत सुरू

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : जिल्ह्यातील रिलायन्स नागोठणे क्रिकेट स्टेडियमवर रविवारी (१६ नोव्हेंबर) महाराष्ट्र विरुद्ध ओडिशा कूच बिहार ट्रॉफी क्रिकेट सामन्याची सुरुवात उत्साहात झाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आयोजित ही १९ वर्षांखालील खेळाडूंसाठीची प्रतिष्ठित राष्ट्रीय चार दिवसीय स्पर्धा असून १६ ते १९ नोव्हेंबरदरम्यान हा सामना खेळवला जाणार आहे.
उद्घाटनप्रसंगी रिलायन्स नागोठणे विभागाचे अध्यक्ष शशांक गोयल, रायगडचे युवा नेते परेश ठाकूर, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदीप नाईक, सामना अधिकारी विनीत विओला, तसेच रिलायन्सचे जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात बीसीसीआयचे ज्येष्ठ व्हिडिओ विश्लेषक सदानंद प्रधान यांचा बीसीसीआयसाठी केलेल्या १८ वर्षांच्या उल्लेखनीय सेवेसाठी सत्कार करण्यात आला. सामन्याच्या यशस्वी आयोजनासाठी मेहनत घेणाऱ्या सामना अधिकारी, पंच, गुणलेखक आणि विविध विभागातील कर्मचाऱ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
सामन्यासाठी रिलायन्स प्रशासनाने मैदानाची उत्तम तयारी केली असून सुसज्ज खेळपट्टी, खेळाडूंसाठी दर्जेदार पॅव्हेलियन, सुरक्षेची भक्कम व्यवस्था अशी विविध सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रिलायन्स कॉर्पोरेट सर्व्हिसेसचे प्रमुख पुनीत मिश्रा, हॉर्टिकल्चर विभाग प्रमुख शरद पवार, सदस्य शांताराम करंजे, सिव्हिल डिपार्टमेंटचे इस्माईल पिट्टू, विद्युत विभागाचे राशिद दापोलकर तसेच रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
कूच बिहार ट्रॉफीतील हा सामना सर्वांसाठी विनामूल्य खुला असून रायगड जिल्ह्यातील सर्व अकॅडमी, क्लबचे खेळाडू व क्रिकेट रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील व सचिव प्रदीप नाईक यांनी केले आहे.
…….




