ताज्या बातम्या
शुभमन गिलचा ‘डबल धमाका’, एजबेस्टनवर भारताचा ऐतिहासिक विजय!

वृत्तसंस्था
बर्मिंघम : शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने एजबेस्टनच्या मैदानावर इंग्लंडला चारीमुंड्या चीत करत दुसऱ्या कसोटीत भव्य विजय मिळवला आहे. तीनही विभागांमध्ये (फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण) वर्चस्व गाजवत भारताने इंग्लंडला तब्बल 336 धावांनी पराभूत केलं. यासह मालिकेत भारतानं बरोबरी साधली.
—
🔹 पहिला डाव – शुभमन गिलचा ऐतिहासिक खेळ
टॉस जिंकून इंग्लंडच्या कर्णधार बेन स्टोक्सने भारताला प्रथम फलंदाजीस बोलावलं. पहिल्या कसोटीत मधल्या फळीत झालेल्या अपयशातून शिकत, भारतानं सुधारलेली कामगिरी दाखवत पहिल्या डावात 587 धावा फटकावल्या.
शुभमन गिलने भक्कम नेतृत्व करताना 269 धावांची शानदार खेळी केली.
रवींद्र जडेजानेही दमदार साथ देत 89 धावा केल्या.
यशस्वी जयस्वालने 87 धावांची चुणूक दाखवली.
—
🔹 गोलंदाजांची चमक – इंग्लंडला पहिल्या डावात 407 धावांत रोखलं
भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत इंग्लंडच्या डावाला लगाम घातला.
मोहम्मद सिराजने 6 बळी टिपले.
आकाश दीपने 4 गडी बाद करत आपला ठसा उमठवला.
हॅरी ब्रूक (158) आणि जेमी स्मिथ (184*) यांच्या शतकांनंतरही इंग्लंडला केवळ 407 धावा करता आल्या. भारताला 180 धावांची आघाडी मिळाली.
—
🔹 दुसऱ्या डावात पुन्हा गिलचा जलवा
दुसऱ्या डावात भारताने 6 बाद 427 धावा करत डाव घोषित केला.
शुभमन गिलने दुसऱ्या डावातही शतक (161) ठोकत ऐतिहासिक कामगिरी केली.
के. एल. राहुल, रिषभ पंत, रवींद्र जडेजा यांनी अर्धशतकं करत भर घातली.
इंग्लंडसमोर ठेवलेलं 608 धावांचं अवघड लक्ष्य म्हणजे पर्वतच होता.
—
🔹 आकाश दीपचा कहर – दुसऱ्या डावात इंग्लंड कोसळलं
आकाश दीपने दुसऱ्या डावातही किमया दाखवत इंग्लंडच्या टॉप ऑर्डरला उखडून टाकलं. त्यांनी ओली पोप, जो रुट, बेन डकेट आणि हॅरी ब्रूकला तंबूत पाठवले.
वॉशिंग्टन सुंदरने स्टोक्सचा बळी घेतला.
मोहम्मद सिराजने क्रॉलीला पॅव्हेलियन दाखवलं.
इंग्लंडचा दुसरा डाव 271 धावांवर संपुष्टात आला आणि भारताने 336 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला.
—