ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

“रायगड रोजगार मेळावा : नवी भरती, नवी उमेद, सक्षम प्रशासनाचा संकल्प” जिल्हा रोजगार मेळाव्यात नियुक्ती आदेश वितरण

प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर – मंत्री आदिती तटकरे


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड :  “जितके सक्षम प्रशासन असेल तितक्या गतिमान सेवांचा लाभ जनतेला देता येईल, म्हणूनच शासनाचा भर प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर आहे,” असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.
रायगड जिल्हा रोजगार मेळावा, अनुकंपा व लिपिक भरती नियुक्ती आदेश वितरणाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम नियोजन भवन, अलिबाग येथे संपन्न झाला. यावेळी त्या बोलत होत्या.
या प्रसंगी रोहयो मंत्री भरत गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुनील इंदलकर, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पठारे, राज्य उत्पादक शुल्क अधिकारी रविकिरण कोळे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, महिला व बालविकास अधिकारी निर्मला कुचिक आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री तटकरे म्हणाल्या की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्याने १०० टक्के कामकाज पूर्ण केले आहे. “आज दिले जाणारे नियुक्तीपत्र हे उमेदवारांच्या जीवनातील नवा अध्याय असून त्यांच्या भविष्यासाठी महत्वाचा टप्पा ठरणार आहे,” असे त्या म्हणाल्या.
मागील वर्षी २१६ उमेदवारांना ग्राम महसूल अधिकारी, १८ उमेदवारांना महसूल सहाय्यक, तर पुरवठा विभागात ४१ उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली.
११ कर्मचाऱ्यांना शिपाई व महसूल सहाय्यक संवर्गातून ग्राम महसूल अधिकारी पदावर पदोन्नती मिळाली.
१७८ अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ, तर ६१ अधिकाऱ्यांना स्थायित्व प्रमाणपत्रे देण्यात आली.
कोतवाल व पोलीस पाटील संवर्गातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
तसेच, महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून अनाथांसाठी १% आरक्षण लागू करण्यात आले असून, याचा लाभ हजारांहून अधिक उमेदवारांना मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. यात चार ऑफिसर, १० पेक्षा अधिक क्लास टू ऑफिसर आणि ४०० हून अधिक क्लास थ्री ऑफिसर यांचा समावेश आहे. “महा-युती सरकार हे अनाथांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, हे यातून स्पष्ट होते,” असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले की, १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत सर्व शासकीय विभागांनी आस्थापना विषयक कामे, बिंदू नामावली व I-GOT प्रणालीवरील प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते १२५ नवनियुक्त उमेदवारांना (MPSC व अनुकंपा) नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले.

Related Articles

Back to top button