‘रायगड बुडाला – पुराच्या जबड्यात संपूर्ण जिल्हा’
पूर की प्लॅनिंग फेल? – रायगडच्या पुरस्थितीने उघडे पाडले यंत्रणेचे अपयश’

रायगड : जिल्ह्यात घाटमाथ्यावरून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री, आंबा आणि कुंडलिका नद्या दुथडी भरून वाहत असून धोक्याची पातळी ओलांडली आहे. परिणामी जिल्ह्यातील महाड, रोहा, तळा, पोलादपूर आदी तालुक्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन ठप्प झालं आहे. अनेक गावांत रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले आहेत. काही ठिकाणी घरांत पाणी शिरल्याने नागरिकांचे स्थलांतर सुरू आहे. अशा गंभीर स्थितीमुळे राजकीय धोरण आणि प्रशासकीय यंत्रणा उघडी पडल्याचे चित्र आहे.
जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांनी प्रवास टाळावा, सुरक्षित ठिकाणी रहावे, असा संदेश देण्यात आला आहे. मात्र, काही भागांत मदतकार्य पोहोचण्यात उशीर होत असल्याची तक्रारही स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
—
तालुकानिहाय स्थिती –
महाड तालुका:
सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे महाड शहरातील रस्ते पाण्याखाली गेले असून रायगड रोडचा संपर्क तुटला आहे. मल्लिकार्जुन मंदिराजवळील पूल पूर्णतः जलमय झाला आहे.
रोहा तालुका:
विसंभीव, महागाव, मेधा आणि कुंबेठी भागांत रस्ते पाण्याखाली गेले आहेत. नाटीवळ रेल्वे ब्रिजवर पाणी साचले असून काही घरांत पाणी शिरले आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.
तळा तालुका:
अलिबाग–तळा आणि रोहा–तळा मार्गावरील पूल जलमय झाले असून वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे.
पोलादपूर तालुका:
डोंगर उतारांवरून माती व दगड रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. भारत सेवा मार्ग आणि माणगाव–मढवली मार्गांचा संपर्क खंडित झाला असून भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे.
अलिबाग शहर:
रामराज पूल पाण्याखाली गेला असून बाजारपेठेत पाणी शिरल्यामुळे व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
म्हसळा तालुका:
जेटेघर परिसरात पूरस्थिती असून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे.
—
प्रशासनाचा इशारा – जनतेला सावध राहण्याचे आवाहन
जिल्हा प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना अलर्ट करण्यात आले असून मदत व पुनर्वसनासाठी कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीचीच खात्री करावी, असे आवाहन करण्यात आले आहे