रायगड जिल्ह्यात शिक्षण विभागाची मोठी कामगिरी — ३४७ शाळाबाह्य व स्थलांतरित मुले शिक्षणाच्या प्रवाहात

अलिबाग, २३ जुलै | प्रतिनिधीरा
यगड जिल्ह्यातील शाळाबाह्य आणि स्थलांतरित मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने उल्लेखनीय कार्य केले आहे. १ जुलै ते १५ जुलै २०२५ या कालावधीत राबवण्यात आलेल्या विशेष शोध मोहिमेत एकूण ३४७ मुले शिक्षणप्रवाहित करण्यात आली आहेत.
या मोहिमेअंतर्गत १४३ शाळाबाह्य मुले व २०४ स्थलांतरित मुले शोधण्यात आली. त्यांना जवळच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये दाखल करण्यात आले असून, ही मोहीम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व प्राथमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली.
—
व्यापक आणि ठोस शोध मोहीम
शाळाबाह्य बालकांचा शोध घेण्यासाठी केवळ घरोघरीच नव्हे तर बसस्थानक, रेल्वे स्थानक, बाजारपेठा, वीटभट्ट्या, दगडखाणी, साखर कारखाने, स्थलांतरित वस्त्या, जंगल परिसर, शेतमळे, बालगृहे, विशेष दत्तक संस्था अशा दुर्गम भागांमध्येही पथकांनी जाऊन सखोल सर्वेक्षण केले.
—
शाळांमध्ये सुरु असलेले विविध उपक्रम
रायगड जिल्ह्यात समग्र शिक्षा अभियान, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, ज्ञानरचनावादी शाळा, कृतीयुक्त अध्यापन, डिजिटल शाळा, आयएसओ मानांकन, मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश, मध्यान्ह भोजन, शिष्यवृत्ती योजना, नवोदय परीक्षा मार्गदर्शन आदी उपक्रम प्रभावीपणे राबवले जात आहेत.
असे असले तरी काही मुले विविध कारणांमुळे अद्याप शाळेपासून दूर आहेत. ही स्थिती लक्षात घेऊन शिक्षण विभागाने उद्दिष्टपूर्तीसाठी अधिक सजगतेने मोहीम राबवली आहे.
—
शिक्षण विभागाचा सकारात्मक संदेश
या मोहिमेमुळे शाळाबाह्य व स्थलांतरित बालकांना शिक्षणाची संधी मिळाली असून, त्यांचे आयुष्य उजळण्याची दिशा मिळाली आहे. शिक्षण विभागाने हे कार्य केवळ आकडेवारीत भर घालण्यासाठी नव्हे, तर “प्रत्येक मूल शिक्षणाच्या प्रवाहात” या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी केले आहे.