रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला तिहेरी राष्ट्रीय सन्मान
“ग्राहकांचा विश्वासच आमचा खरा पुरस्कार”

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 2024-25 या आर्थिक वर्षातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल बेस्ट एनपीए मॅनेजमेंट, बेस्ट सेक्युरिटी ऑपरेशन सेंटर आणि बेस्ट ऑडिट ट्रान्सफॉरमेशन हे तीन नामांकित राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. हे पुरस्कार गोव्यात १७ व १८ सप्टेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑप बँक अँड क्रेडिट सोसायटीजचे चेअरमन ज्योतिंद्र म. मेहता यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.

बँकेच्या काटेकोर कर्जवसुली धोरणामुळे बेस्ट एनपीए मॅनेजमेंट, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील भरीव गुंतवणूक व अत्याधुनिक सुरक्षा प्रणालींच्या अंमलबजावणीमुळे बेस्ट सेक्युरिटी ऑपरेशन सेंटर, तसेच लेखापरीक्षण प्रक्रियेत आधुनिक साधनांचा वापर करून पारदर्शकता, कार्यक्षमता आणि जोखीम नियंत्रण मजबूत केल्याबद्दल बेस्ट ऑडिट ट्रान्सफॉरमेशन हे सन्मान बँकेच्या नावावर आले आहेत. देशातील नामांकित एफसीबीए संस्थेकडून हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

अलीकडेच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेने ₹८५.८० कोटींचा ढोबळ नफा व ₹३५.५९ कोटींचा निव्वळ नफा जाहीर केला. सभासदांना १२.५% लाभांश वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच बँकेचा स्वनिधी ₹७०० कोटींच्या टप्प्यावर पोहोचल्याची माहिती देण्यात आली असून २०३० पर्यंत तो ₹१००० कोटींवर नेण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. आगामी दोन वर्षांत व्यवसाय ₹१०,००० कोटींवर नेण्याचा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
या तिहेरी राष्ट्रीय सन्मानामुळे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राज्यातील सहकार क्षेत्रात आपले अग्रस्थान अधिक ठळक केले आहे. “पुरस्कारांनी समाधान मिळते, पण खरा पुरस्कार म्हणजे ग्राहकांचा विश्वास आणि सहकार्य”, असे प्रतिपादन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी केले. अध्यक्ष जयंत पाटील, संचालक मंडळ, अधिकारी-कर्मचारी व ग्राहक यांच्या एकत्रित प्रयत्नांचे हे यश असल्याचे त्यांनी नमूद केले.




