क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

रायगड जिल्हा बनतोय ‘क्रिकेट हब’ एमसीए स्पर्धांमुळे ग्रामीण खेळाडूंना नवी संधी–जिल्हास्तरावरून राज्यस्तराकडे झेप


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
क्रीडा प्रतिनिधी
रायगड :  महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरजिल्हा निमंत्रित क्रिकेट स्पर्धांच्या यशस्वी आयोजनामुळे रायगड जिल्हा केवळ सामने घेणारा जिल्हा न राहता हळूहळू ‘क्रिकेट हब’ म्हणून उदयास येत असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. विविध वयोगटांतील एमसीए दर्जाच्या सामन्यांचे सातत्याने आयोजन झाल्याने रायगड जिल्ह्यातील क्रिकेट संस्कृतीला नवी दिशा मिळाली असून, विशेषतः ग्रामीण व निमशहरी भागातील खेळाडूंना घरच्या जिल्ह्यातच राज्यस्तरीय अनुभव मिळू लागला आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) च्या स्पर्धांमुळे रायगडमधील खेळाडूंना मुंबई, पुणे किंवा इतर मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागत नसून, घरच्या मैदानावरच उच्च दर्जाच्या सामन्यांत खेळण्याची संधी मिळत आहे. याचा थेट परिणाम खेळाडूंच्या कामगिरीवर होत असून प्रवासाचा खर्च, शारीरिक थकवा आणि मानसिक ताण कमी होत असल्याने खेळाडू अधिक आत्मविश्वासाने मैदानात उतरू लागले आहेत.
एमसीए स्पर्धा समितीचे अध्यक्ष राजू काणे यांनी माध्यमांशी बोलताना रायगड जिल्ह्यातील सुसज्ज मैदाने, दर्जेदार खेळपट्ट्या, नियोजनबद्ध व्यवस्थापन तसेच पंच व स्कोअरर्सची उपलब्धता याबाबत समाधान व्यक्त केले आहे. गेल्या दोन वर्षांत रायगड जिल्ह्यात एमसीए-प्रमाणित मुबलक पंच व स्कोअरर्स तयार होणं ही जिल्ह्यातील क्रिकेट प्रगतीची मोठी उपलब्धी मानली जात आहे.
या सामन्यांचा फायदा केवळ खेळाडूंनाच नव्हे तर स्थानिक क्रीडा परिसंस्थेलाही होत आहे. ग्राउंड स्टाफ, पंच, स्कोअरर्स, वाहतूक व्यवस्था, हॉटेल व भोजन व्यवस्थेशी संबंधित व्यावसायिकांना या स्पर्धांमुळे नियमित काम मिळू लागले असून, त्यामुळे स्थानिक अर्थकारणालाही चालना मिळत आहे. क्रिकेटच्या माध्यमातून जिल्ह्यात रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
एमसीए इन्व्हिटेशन मॅचेसबरोबरच रायगड जिल्ह्यात बीसीसीआय दर्जाचे सामनेही यशस्वीरीत्या पार पडले असून, भविष्यात रायगड जिल्ह्यात अधिकाधिक एमसीए व बीसीसीआय सामने देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. एमसीए अध्यक्ष रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली हे प्रयत्न प्रत्यक्षात उतरल्यास रायगड जिल्हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा क्रिकेट केंद्रबिंदू ठरण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Back to top button