रायगडताज्या बातम्या

रायगड जिल्हा परिषदेत लाचलुचपत प्रकरण 


रायगड (प्रतिनिधी) : जलजीवन मिशन योजनेतील कामाचे बिल मंजूर करून देण्यासाठी ३५ हजार रुपयांची लाच मागणी करत तडजोडीअंती २५ हजार रुपये स्वीकारणाऱ्या तीन जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे.

यामध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील कनिष्ठ लिपिक आशिष कांबळे, शिपाई दिलीप कावजी आणि खासगी कंत्राटदार विलास भिकाजी ढेबे यांचा समावेश असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

जलजीवन मिशन अंतर्गत एम.एस.एस. कन्स्ट्रक्शन वडखळ यांना मोझे (ता. पेण) येथे नळ पाणीपुरवठा कामाचे कंत्राट मिळाले होते. काम पूर्ण झाल्यानंतर ६९ लाख रुपयांच्या बिलाच्या मंजुरीसाठी ठेकेदाराने वारंवार प्रयत्न केले. मात्र बिल मंजुरीसाठी आरोपींकडून ३५ हजार रुपयांची लाच मागण्यात आली. तडजोडीनंतर २५ हजार रुपयांवर व्यवहार ठरल्यानंतर आज ही रक्कम स्वीकारताना सापळा कारवाई करण्यात आली.

ही कारवाई पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधिक्षक सरिता भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. नारायण सरोदे, पोलीस निरीक्षक निशांत धनवडे व त्यांच्या पथकाने केली.

आरोपींविरुद्ध लाच स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.


Related Articles

Back to top button