रायगड जिल्हा परिषदेच्या पेन्शन अदालतीत ५२ अर्ज निकाली

अलिबाग, दि. २३ : रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने नुकतेच पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले. या अदालतीत एकूण ५२ प्रलंबित अर्ज निकाली काढण्यात आले असून उर्वरित प्रकरणे लवकरच मार्गी लावण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ही अदालत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे यांनी या अदालतीचे संचालन केले.
पेन्शन अदालतीत विविध विभागांतील १०४ सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित अर्ज विचाराधीन होते. त्यातील ५२ अर्ज तात्काळ निकाली काढण्यात आले. याशिवाय, नव्याने ४२ सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले असून त्यावर लवकरात लवकर कार्यवाही केली जाणार आहे.
या प्रसंगी शिक्षण, बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, अर्थ, आरोग्य, ग्रामपंचायत, तसेच पशुसंवर्धन विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्रशासनाकडून प्रलंबित सर्व प्रकरणांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना वेळेत लाभ मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.