ताज्या बातम्यारायगड
रायगड किनाऱ्यावर संशयित ‘बोया’ प्रकरणात मोठा खुलासा; 1000 हून अधिक बेकायदेशीर बोटी उघड, रायगड जिल्ह्यात सागरी सुरक्षेला धोका?

रायगड : मुरुड-कोरलई समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट प्रत्यक्षात बोट नसून ‘बोया’ असल्याचे AIS ट्रान्सपोंडरद्वारे स्पष्ट झाले आहे. मात्र, या प्रकरणाचा तपास करत असताना अधिक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील एक हजाराहून अधिक बोटी बेकायदेशीर असून त्यांची नोंदणी झालेली नसल्याचे उघडकीस आले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी दिली.
06 जुलैच्या रात्री कोर्लई किल्ल्याजवळ एक संशयास्पद बोट ‘Muqadar Boya 99’ (MMSI: 463800411) दिसून आली होती. ही बोट पाकिस्तानातून आलेली असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर तटरक्षक दल, नौदल आणि दिल्लीमधील संबंधित यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक पोलीस सतर्क झाले. बोटमध्ये कोणीही आढळले नव्हते, मात्र तिच्या उपस्थितीमुळे सखोल तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान स्पष्ट झाले की ती वस्तू प्रत्यक्षात एक बोया आहे. मात्र, अद्याप त्या बोयाचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे रायगड पोलीस आणि इतर शासकीय यंत्रणांकडून सर्च आणि कोंबिंग ऑपरेशन राबवले जात आहे. याच तपासात एक हजाराहून अधिक बोटी बेकायदेशीर असून त्यांची नोंदणी नसल्याचे निष्पन्न झाले. याबाबतची माहिती मत्स्य व्यवसाय आयुक्त आणि सहआयुक्तांना कारवाईसाठी देण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक दलाल यांनी स्पष्ट केले की, सागरी आणि मच्छीमारांच्या सुरक्षेसाठी बोटींची नोंदणी अत्यावश्यक आहे. एखादी दुर्घटना घडल्यास मदत पोहोचवण्यासाठी आणि तपास सुलभ होण्यासाठी नोंदणी अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले.