ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
रायगडात ‘समृद्ध पंचायतराज’ची जमीनीवर उतरलेली ताकद! ग्रामपंचायतींच्या कारभाराला नवी दिशा; विकासात ग्रामस्थ थेट सहभागी

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग : कागदावरच्या योजनांऐवजी प्रत्यक्ष गावकुसात उतरून बदल घडवण्याचा प्रयत्न म्हणजेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान. रायगड जिल्ह्यात हे अभियान केवळ प्रशासकीय उपक्रम न राहता लोकसहभागातून ग्रामीण परिवर्तनाची चळवळ बनताना दिसत आहे.
रायगड जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील १६ तालुक्यांमधील विविध ग्रामपंचायतींना भेटी देत योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी, ग्रामस्थांचा सहभाग आणि प्रशासनाची कार्यक्षमता यांचा आढावा घेण्यात आला.
या अभियानांतर्गत अलिबाग, माणगाव, रोहा, पेण, उरण, पनवेल, मुरूड, कर्जत, महाड, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, पोलादपूर, खालापूर आणि सुधागड या तालुक्यांतील डझनावधी ग्रामपंचायतींना पथकाने भेटी दिल्या. या भेटींमध्ये ग्रामपंचायतींमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची पाहणी करण्यात आली तसेच नागरिकांच्या गरजा, उपलब्ध सुविधा आणि स्थानिक पातळीवरील अडचणी जाणून घेऊन त्यावर उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ कामांची तपासणी न करता ग्रामस्थांशी थेट संवाद साधत त्यांना विकास प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले. त्यामुळे ग्रामपंचायत ही केवळ ठराव करणारी संस्था न राहता स्थानिक विकासाची केंद्रबिंदू संस्था असल्याची जाणीव नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी ग्रामसभांमधील उपस्थिती वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले.
स्वच्छता, कचऱ्याचे योग्य नियोजन, सीसीटीव्ही व्यवस्था, स्वच्छ पाणीपुरवठा, महिलांचे आर्थिक स्वावलंबन व सक्षमीकरण, बचत गटांचे बळकटीकरण तसेच डिजिटल प्रशासन व ई-गव्हर्नन्स यांसारखे विविध उपक्रम ग्रामपंचायतींमार्फत प्रभावीपणे राबविले जात असल्याचे निरीक्षण पथकाने नोंदविले. यासोबतच पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने जनजागृतीवरही भर देण्यात आला.
अभियानामुळे ग्रामपंचायतींची प्रशासनिक क्षमता वाढविणे, विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, स्थानिक महसूल व आर्थिक स्त्रोत मजबूत करणे आणि पारदर्शक व लोकाभिमुख कारभाराला चालना देणे शक्य होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींनी नव्या उपक्रमांसाठी पुढाकार घेण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून या कालावधीत ग्रामपंचायती आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन अधिक जिद्दीने काम केल्यास रायगड जिल्ह्याला राज्यात प्रथम क्रमांक मिळवून देणे शक्य होईल, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी व्यक्त केला आहे.




