ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

रायगडात ‘करक्रांती’! ग्रामपंचायतींच्या घरपट्टी वसुलीत ऐतिहासिक उसळी; समृद्ध पंचायत राज अभियानामुळे 4 महिन्यांत 90.77 कोटींची थेट वसुली


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

अलिबाग : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी रायगड जिल्ह्यात सुरू असून त्याचा थेट सकारात्मक परिणाम ग्रामपंचायतींच्या घरपट्टी वसुलीवर दिसून येत आहे. रायगड जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या अभियानामुळे सप्टेंबर ते डिसेंबर 2025 या पहिल्या टप्प्यात तब्बल 90 कोटी 77 लाख रुपयांची घरपट्टी वसुली करण्यात यश आले आहे. या वाढीव वसुलीमुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकत आहेत.

रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या घरपट्टीची मोठी थकबाकी प्रलंबित होती. ही थकबाकी वसूल करण्यासाठी समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायतींमार्फत विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले. सोमवार आणि शनिवार असे आठवड्यातील दोन दिवस घरपट्टी भरण्यासाठी कॅम्प घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या विशेष कॅम्पना ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला असून अनेक वर्षांची थकबाकी या माध्यमातून भरली गेली आहे.
अभियानाच्या कालावधीत 13 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीमुळे घरपट्टी वसुलीला आणखी गती मिळाली. या लोकअदालतीत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून घरपट्टीची 27 हजार 341 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 8 हजार 316 प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यात आला असून यामधून 6 कोटी 80 लाख 14 हजार 963 रुपयांची घरपट्टी वसूल होण्यास मदत झाली आहे.

समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत घरपट्टी वसुली वाढण्यामागे अनेक महत्त्वाची कारणे ठरली आहेत. सोमवार व शनिवारच्या विशेष कॅम्पबरोबरच थकबाकीदारांना 50 टक्के सवलत देण्याचा शासन निर्णय, लोकअदालतीत प्रकरणांचा जलद निपटारा तसेच ग्रामपंचायतींकडून क्यूआर कोड व ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांना कर भरणे सुलभ झाले आहे.
घरपट्टीप्रमाणेच पाणीपट्टी वसुलीतही लक्षणीय वाढ झाली आहे. एप्रिल ते डिसेंबर 2025 या कालावधीत पाणीपट्टीची 50.56 टक्के वसुली झाली असून पहिल्या टप्प्यात सुमारे 9 कोटी रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. लोकअदालतीमध्ये पाणीपट्टीची 6 हजार 689 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 1 हजार 474 प्रकरणांचा निपटारा होऊन 1 कोटी 14 लाख 41 हजार 550 रुपयांची वसुली झाली आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी सांगितले की, एप्रिल ते डिसेंबर 2025 या कालावधीत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून सुमारे 62 टक्के घरपट्टी वसुली करण्यात आली आहे. समृद्ध पंचायत राज अभियानामुळे या वसुलीला मोठी गती मिळाली असून अभियानाची मुदत आता 31 मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस घरपट्टी वसुली किमान 90 टक्क्यांपर्यंत नेण्याचा मानस असून त्याबाबत ग्रामपंचायतींना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामस्थांनीही घरपट्टी भरून ग्रामपंचायतींना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.


Related Articles

Back to top button