रायगडात आज ७२ हजारांहून अधिक गणपती-गौराईचे विसर्जन

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग | प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात आज (दि.२ सप्टेंबर) सात दिवसांच्या गणरायासह गौराईला जड अंतःकरणातून भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे. यंदा जिल्ह्यातील समुद्र, नदी, तलाव व कृत्रिम तलाव अशा ५०० पेक्षा अधिक ठिकाणी तब्बल ७२ हजार ६४३ मूर्तींचे विसर्जन होणार आहे.

गेल्या आठवडाभर गणराय व गौराईची भक्तिभावाने पूजा, आरत्या व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सव साजरा करण्यात आला. रविवारी (दि.१) घराघरांत गौराईचे आगमन झाले होते. आज त्यांचे गणेशमूर्तींसह विसर्जन होणार आहे.
मिरवणुकीत ढोल-ताशे, खालू बाजे, बेंजो तसेच भजन-कीर्तनाच्या कार्यक्रमांनी जल्लोष साजरा होणार आहे. महिलांनी गौराईला पारंपरिक साजशृंगार अर्पण करून पूजा केली. जिल्ह्यातील गावोगावी फुगड्या, धावऱ्या नाच व कुस्ती स्पर्धांमुळे उत्सवाची रंगत वाढली.

विसर्जनावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी २८०० पोलीस अधिकारी-कर्मचारी व होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय ११५० जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे.
“सण आनंदात आणि शांततेत साजरा करा. लेझर वापरण्यास बंदी आहे. वयोवृद्ध, महिला व मुलांचा विचार करून मिरवणूक काढावी,” असे आवाहन रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी केले.




