ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय

“रायगडमध्ये शेकापक्षावरचा प्रयोग यशस्वी… आता पुढचा नंबर कोणाचा? इतर पक्षांनी आताच सावध व्हा.”

लालबावट्याचा पराभव नाही; भांडणात तिसऱ्याचा उदय, रायगडमधील राजकीय युग बदलले


फडशा 

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

आविष्कार देसाई 

रायगडमधील राजकारणाकडे अजूनही अनेकजण शेकापक्षाच्या पराभवाच्या नजरेतून पाहतात; पण ही कथा पराभवाची नसून जागा काबीज करण्याची आहे. शेतकरी कामगार पक्ष हरला नाही. त्याची राजकीय जागा नियोजनबद्ध पद्धतीने रिकामी करून घेतली गेली. भाजपा या बलाढ्य पक्षाने निवडणूक आणि सत्तेचे अचूक व्यवस्थापन करत आधी तिथे व्याक्युम निर्माण होऊ दिले आणि नंतर त्याच सुरक्षित झालेल्या जागेवर नियंत्रण मिळवत निवडणूक, सत्ता आणि स्थानिक राजकारणाची संपूर्ण परिभाषाच बदलली आणि शेवटी राजकीय युग बदलून टाकले.

एकेकाळी गावपातळीवर नातेसंबंध, कार्यकर्ते आणि स्थानिक प्रभावावर उभा असलेला पक्ष हळूहळू निवडणूक व्यवस्थेच्या नव्या राजकारणात अडकत गेला. लोकसभा निवडणुकीत स्वतःचा उमेदवार जिंकवण्याची ताकद नसल्याने इतरांना पाठिंबा देण्याची वेळ आली. हा पहिला संकेत होता शेकापक्ष आता स्वतः निर्णायक राहिलेला नाही.

विधानसभा निवडणुकीत चित्र आणखी स्पष्ट झाले. रायगड आणि अलिबागसारख्या बालेकिल्ल्यात खातेही उघडता आले नाही. जयंत पाटील यांच्या घरातील उमेदवार चित्रलेखा पाटील यांचा पराभव झाला. हा केवळ एका उमेदवाराचा पराभव नव्हता; मतदारांनी परंपरागत प्रभावाला दिलेला स्पष्ट इशारा होता.
याच काळात पक्षातील मतभेद उघड झाले. निर्णय प्रक्रियेत नाराजी वाढत गेली आणि शेकापचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांचे सख्खे बंधू पंडित पाटील, भाचे  आस्वाद पाटील व इतरांनी भाजपाचा मार्ग स्वीकारला. ही फूट वैयक्तिक नव्हती; ती बदलत्या राजकीय वास्तवाची प्रतिक्रिया होती. कारण स्थानिक नेतृत्व पक्षापेक्षा स्वतःचा प्रभाव टिकवण्याच्या प्रयत्नात गेले.
२०२४ च्या निवडणुकीत मतांचे विभाजन झाले आणि विरोधक मजबूत झाले. आकडेवारी स्पष्ट सांगते.  दोन्ही गट एकत्र असते तर निकाल वेगळा असू शकला असता. म्हणजे मतदारांनी पूर्णपणे नाकारले नव्हते; ते विभागले गेले होते.
भाजपमध्ये प्रवेशानंतरही पाटील गटाला अपेक्षित यश मिळाले नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पाटील कुटुंबातील व्यक्तींचा पराभव झाला. म्हणजे व्यक्ती बदलल्या पण मतदाराचा कल बदलला नाही. यावरून स्पष्ट झाले की पारंपरिक प्रभाव मर्यादित झाला आहे.
मात्र याच ठिकाणी सर्वात महत्त्वाचा बदल घडला. शेकापक्ष वेगळा आणि पाटील गट वेगळा झाल्यानंतर निर्माण झालेल्या पोकळीत भाजपने आपली राजकीय जागा निर्माण केली. पूर्वी जिल्हा परिषदेमध्ये मोजक्या जागांपुरता मर्यादित असलेला पक्ष थेट पंधरा जागांपर्यंत पोहोचला. ही वाढ अचानक मतपरिवर्तनामुळे नव्हे; तर विभाजनामुळे निर्माण झालेल्या रिकाम्या जागेमुळे झाली. संघर्ष दोन गटांत राहिला, पण फायदा तिसऱ्याला झाला.
यातून एकाच वेळी दोन गोष्टी घडल्या त्या म्हणजे शेकापक्षाची ताकद कमी झाली आणि पाटील कुटुंबाची एकत्रित पकड सैल झाली. परिणामी मतदारांमध्ये कायमस्वरूपी निष्ठा न राहता पर्याय निवडण्याची प्रवृत्ती वाढली. पूर्वी चिन्ह जिंकायचे; आता परिस्थिती जिंकते.आधी फूट आणि मग प्रवेश ही निव्वळ योगायोगाची मालिका नव्हती. घटना क्रमाने पाहिल्यास पहिले स्थानिक नेतृत्वात मतभेद निर्माण झाले, त्यानंतर गटबाजी वाढली, मग निवडणुकीत मतांचे विभाजन झाले आणि शेवटी तिसऱ्याचा झपाट्याने उदय झाला. हा मतदारांचा विचार बदल नव्हता, तर रिकाम्या जागेवर भाजपाने केलेला कब्जा होता. ही त्यांच्या पक्षाची रणनीती आहे आणि त्यांनी राजकीय प्रगल्भता दाखवत  घेतलेला निर्णय चुकीचा आहे असेही म्हणता येणार नाही.

रायगडमध्ये आगरी-कोळी हा ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि हा समाज परंपरेने जमिनीवर लढणाऱ्या, स्थानिक प्रश्नांवर राजकारण करणाऱ्या पक्षांसोबत राहिला. पण नव्या समीकरणात वेगळे चित्र दिसू लागले. ज्या भागात स्थानिक हक्क, जमीन, खाडी, मासेमारी, शेती आणि विकास संघर्षांवर राजकारण व्हायला हवे होते, त्या भागात बाह्य राजकीय अजेंडा असलेला पक्ष मजबूत होत गेला. हे मतपरिवर्तन नव्हते, तर सत्ता-व्यवस्थेचे नियोजन होते.

याच पार्श्वभूमीवर पंडित पाटील आणि आस्वाद पाटील यांना पुन्हा सन्मानाने घेतल्यास पक्ष उभा राहील का हा प्रश्न उपस्थित होतो. संघटन काही प्रमाणात सक्रिय होऊ शकते, मतांचे विभाजन कमी होऊ शकते, पण हरवलेले राजकीय युग परत येण्याची शक्यता कमी आहे. कारण समस्या व्यक्तींची नाही तर राजकीय संरचनेची आहे.

आज रायगडमध्ये पक्ष नाही तर जागा महत्त्वाची झाली आहे. जो रिकामी जागा भरतो तो वाढतो. शेकापक्ष आणि पाटील गट यांच्यातील संघर्षाने निर्माण केलेली जागा भाजपने भरली आणि हाच या संपूर्ण घडामोडींचा केंद्रबिंदू आहे.
म्हणून हा केवळ पराभव नाही, तर सत्तास्थानांतर आहे. रायगडमध्ये कदाचित शेकापक्ष राहील… कारण कोणताही पक्ष कधीच संपत नाही. पण पूर्वीसारखा त्यांचा प्रभाव राहीलच असे नाही.
कारण राजकारणात हरलेला नेहमी संपत नाही.
कधी कधी त्याची जागा दुसरा घेतो, आणि तेव्हाच युग बदलते.

भाजपने ज्या पद्धतीने शेकापक्षाला रायगडच्या राजकारणातून जवळपास पुसून टाकले, त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटलाही संपवण्यासाठी तो मागे हटणार नाही, अशी जोरदार चर्चा रायगडच्या राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. कारण त्याचे राजकारण सहअस्तित्वाचे नाही तर पूर्ण वर्चस्वाचे आहे. शतप्रतिशत भाजपाचीच सत्ता आणि इतर कोणत्याही पक्षाला जागा नाही. ही धोक्याची घंटा वेळीच ओळखली नाही तर उद्या उशीर झालेला असेल; शेकापक्षाची जी अवस्था झाली तीच अवस्था इतरांची होण्यासाठी वेळ लागणार नाही…

….


Related Articles

Back to top button