ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
प्रदर्शनातून ई-कॉमर्सकडे… महिलांचा बचत गट आता मोबाईलवर, रायगडमध्ये डिजिटल व्यवसायाचा नवा अध्याय
मीनी सरस, जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
रायगड जिल्ह्यात भरविण्यात आलेले “मिनी सरस प्रदर्शन” हे केवळ विक्रीचे व्यासपीठ न राहता, महिला बचतगटांच्या डिजिटल व्यवसायाकडे होणाऱ्या प्रवासाची सुरुवात ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळत असतानाच, “उमेद” अॅपवर बचतगटांची नोंदणी हा डिजिटल परिवर्तनाचा नवा अध्याय ठरणार असल्याचे प्रतिपादन मंत्री अदिती तटकरे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आयोजित या प्रदर्शनात जिल्ह्यातील महिला स्वयंसहाय्यता गटांनी तयार केलेली विविध उत्पादने नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मात्र यावेळी विशेष लक्ष वेधले ते म्हणजे १०० बचतगटांची उमेद अॅपवर झालेली नोंदणी. यामुळे पारंपरिक प्रदर्शनाच्या चौकटीतून बाहेर पडत, महिला गट आता मोबाईलच्या माध्यमातून व्यवसाय करण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसत आहे.

आजपर्यंत बचतगटांची विक्री ही प्रदर्शन, मेळावे किंवा स्थानिक बाजारपेठांपुरती मर्यादित होती. परंतु डिजिटल प्लॅटफॉर्मवर नोंदणी झाल्यानंतर, भविष्यात या उत्पादनांना ऑनलाइन ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची मोठी संधी उपलब्ध होऊ शकते. यामुळे महिलांना २४ तास चालणारी बाजारपेठ मिळून उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होण्याची शक्यता आहे.
महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे पुढे म्हणाल्या की, “प्रत्येक तालुक्यात असे प्रदर्शन भरवूया” असे आवाहन करत, महिला सक्षमीकरणाला चालना देण्यावर भर दिला.
जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी सांगितले की, राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर काम सुरू असून, येणाऱ्या जिल्हा परिषद अर्थसंकल्पात महिला बचतगटांसाठी भरीव तरतूद केली जाणार आहे.
उपाध्यक्ष मधुकर पाटील यांनीही सांगितले की, शासनाच्या विविध योजनांमुळे महिला बचतगट आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असून, त्यांच्या पुढील प्रगतीसाठी जिल्हा परिषदेचे सर्वतोपरी सहकार्य राहील.

जिल्ह्यात सध्या १९,५६५ महिला स्वयंसहाय्यता गट कार्यरत असून, फिरते कर्ज व बँक कर्जाच्या माध्यमातून २ कोटी ८९ लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. तसेच उमेद अंतर्गत अॅपवर १०० बचतगटांची नोंदणी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर डिजिटल नोंदणीमुळे बचतगटांच्या व्यवसायाला नवीन दिशा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.
या कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद अमित नाईक, गटनेते वैकुंठ पाटील, संतोष बैलमारे, अभिषेक विचारे, प्रभाकर म्हात्रे, जनार्दन भस्मा, प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) जालिंदर पठारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) विशाल तनपुरे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी राहुल कदम, कार्यकारी अभियंता विनायक तेलंग, महिला व बालकल्याण समिती अधिकारी निर्मला कुचिक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महारुद्र नाळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहीतुले यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, जिल्हा परिषद सदस्य तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

दरम्यान, २४ मार्चपर्यंत सुरू असलेल्या या प्रदर्शनात विविध उत्पादने, खाद्यपदार्थ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी नागरिकांना मिळत असून, मोठ्या प्रमाणावर प्रतिसादही मिळत आहे.
दरम्यान, या डिजिटल प्रवासात काही महत्त्वाचे प्रश्नही उपस्थित होत आहेत. उमेद अॅपच्या माध्यमातून प्रत्यक्ष ऑनलाइन विक्री कधी सुरू होणार? लॉजिस्टिक्स, डिलिव्हरी आणि पेमेंट व्यवस्था कशी उभी राहणार?
यांची उत्तरे मिळाल्यास, रायगडमधील महिला बचतगट स्थानिक विक्रेत्यांपासून थेट डिजिटल उद्योजकांपर्यंतचा प्रवास पूर्ण करतील आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत एक नवा अध्याय लिहिला जाईल, यात शंका नाही.
……




