ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय

‘रायगडमध्ये कोणते राजकीय उद्योग सुरू करायचे?’ — उदय सामंतांच्या सूचक विधानाने सत्तासंघर्ष अधिकच गडद

सामंत–तटकरे भेटीने राजकीय गुड वाढले, नवीन सत्ता समीकरणांची चाहूल


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
आविष्कार देसाई 
अलिबाग  |
“रायगड जिल्ह्यामध्ये कोणते राजकीय उद्योग सुरू करायचे याबाबत चर्चा झाली,” असे सूचक विधान मंत्री उदय सामंत यांनी केल्यानंतर रायगडच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. रायगड जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेचा तिढा कायम असतानाच हे वक्तव्य समोर आल्याने ‘उद्योग’ हा शब्द विकासाचा की राजकीय समीकरणांचा, यावरच चर्चा रंगू लागली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला असला तरी अद्याप सत्ता स्थापन झालेली नाही. नियमानुसार ३० दिवसांच्या आत प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित असते. मात्र प्रशासनाकडून ठोस हालचाल दिसून येत नसल्याने अनिश्चितता वाढली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे १६ आणि भाजपचे १५ सदस्य निवडून आले आहेत. निवडणूकपूर्व युती असल्याने सत्ता स्थापनेचे अंकगणित स्पष्ट वाटत असले तरी अंतिम निर्णय प्रलंबित आहे. दोन्ही पक्षांचे सदस्य सध्या गोव्यात असल्याची चर्चा आहे. संभाव्य ‘घोडेबाजार’ टाळण्यासाठी ही खबरदारी घेतल्याचे बोलले जाते.
या संपूर्ण प्रक्रियेत सुनील तटकरे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ते केवळ खासदार नसून प्रदेशाध्यक्षही आहेत. रायगड हा त्यांचा प्रभावक्षेत्र मानला जात असल्याने सत्तासमीकरणांमध्ये त्यांचे मत निर्णायक ठरणार, याबाबत शंका नाही.
तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात प्राथमिक चर्चा झाली असली तरी अंतिम निर्णय महायुतीतील प्रमुख नेते घेतील. त्यांच्या या संयत विधानाने सस्पेन्स कायम ठेवला आहे.
काही दिवसांपूर्वी तटकरे यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशीही भेट झाली होती. त्या भेटीत नेमकी कोणती राजकीय ‘डाळ शिजली’ हे स्पष्ट नसले तरी शिंदे गटाच्या शिवसेनाला सत्तेबाहेर ठेवण्याची रणनीती आखली गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शिवसेनेने २१ जागा जिंकल्या असूनही त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचे चित्र दिसत आहे. मंत्री भरत गोगावले यांनी काही दिवसांपूर्वी “भविष्यातील निवडणुका बाकी आहेत” असा सज्जड इशारा दिला होता. त्यामुळे सत्तासंघर्ष केवळ जिल्हा परिषद मर्यादित नसून आगामी राजकीय समीकरणांशी जोडलेला असल्याचे संकेत मिळत आहेत.
 राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयातील सामंत–तटकरे भेट ही “अतिशय खाजगी” असल्याचे सामंत यांनी सांगितले आणि सत्ता स्थापनेवर चर्चा झालेली नसल्याचे स्पष्ट केले. मात्र “रायगडमध्ये कोणते उद्योग सुरू करायचे” या सूचक विधानानेच चर्चांना उधाण आले.
हा उद्योग खरोखर औद्योगिक विकासाचा संदर्भ आहे की नव्या राजकीय आघाडीचा? सत्ता स्थापनेच्या अनिश्चिततेत हा शब्दप्रयोग अधिकच अर्थपूर्ण ठरतो.
रायगड जिल्हा परिषदेत सध्या केवळ आकड्यांचे गणित नाही, तर प्रतिष्ठा, वर्चस्व आणि भविष्यातील निवडणुकांची रणनीती दडलेली दिसते.
सुनील तटकरे यांची सक्रिय भूमिका, रवींद्र चव्हाण यांच्याशी झालेली भेट, गोवा सफारी, शिवसेनेला दूर ठेवण्याच्या चर्चा आणि उदय सामंत यांचे ‘राजकीय उद्योग’ वक्तव्य या सर्व घडामोडींमुळे रायगडच्या राजकारणातील धुके अधिकच गडद झाले आहे.
आता महायुतीतील प्रमुख नेत्यांचा अंतिम निर्णयच या ‘राजकीय उद्योगा’चा खरा अर्थ स्पष्ट करणार आहे. तोपर्यंत रायगडमध्ये सत्तेपेक्षा चर्चांचाच बाजार तेजीत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.
……

Related Articles

Back to top button