ताज्या बातम्या
रायगडमध्ये आरोग्यसेवेसाठी नवे पर्व – स्वदेस फाउंडेशन व आरोग्य विभागात सामंजस्य करार

रायगड : जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी स्वदेस फाउंडेशन आणि जिल्हा सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. दि. ७ जुलै २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या करारावर दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधींनी स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे महाड, पोलादपूर, माणगाव, तळा, श्रीवर्धन, म्हसळा आणि सुधागड या सात तालुक्यांतील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार आहेत.
जिल्हाधिकारी किशन जावळे आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार झाला. यावेळी उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रविंद्र शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, स्वदेस फाउंडेशनचे संचालक प्रदीप साठे, तुषार इनामदार, नजीर शिकलगार, मेघना फडके, तसेच जुलेखा शेख हे मान्यवर उपस्थित होते.
करारावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांच्या वतीने डॉ. नितीन बावडेकर, तर स्वदेस फाउंडेशनच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे आणि उपसंचालक डॉ. सुरेंद्र यादव यांनी स्वाक्षरी केली. राज्य आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला.
🔹 कराराचा उद्देश:
ग्रामीण भागात दर्जेदार व सर्वसमावेशक आरोग्य सेवा पोहोचवणे
शासकीय आरोग्य कार्यक्रमांबाबत जनजागृती वाढवणे
शेवटच्या टप्प्यापर्यंत अत्यावश्यक आरोग्य सुविधा पोहोचवणे
सार्वजनिक आरोग्य यंत्रणेला बळकट करणे
स्वदेस फाउंडेशनचे संस्थापक रॉनी स्क्रूवाला आणि झरीना स्क्रूवाला यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था रायगड जिल्ह्यात समग्र 360 अंश दृष्टिकोनातून ग्रामीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. नव्या भागीदारीमुळे या कामाला अधिक गती मिळणार असून, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होतील.