ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय

रायगडचा धुरंदर रणसंग्राम : ‘तटकरे’ फॅक्टर न समजल्याची घातक राजकीय चूक

सत्ता, अहंकार आणि तटकरे : रायगडमधील संघर्षाची आतली गोष्ट


राजकारणात संघर्ष अपरिहार्य असतो.
मात्र संघर्ष करताना कोणाशी, कोणत्या ताकदीने आणि कुठपर्यंत जायचे याचे भान राखले गेले नाही, तर इतिहास पुन्हा एकदा स्वतःची पुनरावृत्ती करतो.
हा लेख तटकरे समर्थक नाही. हा लेख शिवसेना विरोधीही नाही. हा लेख आहे, रायगडच्या राजकीय वास्तवाचा आरसा. तो आरसा पाहायचा की फोडायचा, हा निर्णय राजकारण्यांनी घ्यायचा आहे.
——————————————————
फडशा
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
आविष्कार देसाई 
रायगड जिल्ह्यात सध्या जे काही सुरू आहे, ते केवळ दोन पक्षांमधील वाद नाही. हा संघर्ष आहे सत्तेचा, वर्चस्वाचा आणि राजकीय अस्तित्वाचा. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील संघर्ष आता इतक्या टोकाला पोहोचला आहे की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही थेट मध्यस्थी करावी लागली. ही बाबच सांगून जाते की, रायगडमधील राजकारण किती धोकादायक पातळीवर पोहोचले आहे.
मंत्री भरत गोगावले आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची अजित पवार यांनी घेतलेली बैठक म्हणजे एक प्रकारे “वेळेत आवर घाला” असा स्पष्ट इशाराच होता. त्यानंतर आदिती तटकरे यांच्याशी संवाद साधून वाद वाढू नये, अशी सूचना देणे हे केवळ संयमाचे नव्हे, तर राजकीय वास्तवाचे भान ठेवण्याचे लक्षण आहे. मात्र प्रश्न कायम आहे की,
हा संघर्ष थांबवायचा तरी कोणासाठी? आणि का?
रायगडच्या राजकारणात एक कटू पण निर्विवाद सत्य आहे. सुनील तटकरे यांच्या शिवाय जिल्ह्यात राजकीय, प्रशासकीय किंवा सामाजिक पानही हलत नाही. हे विधान अतिशयोक्ती नसून इतिहासाने सिद्ध केलेली वस्तुस्थिती आहे. गेल्या अनेक दशकांपासून तटकरे यांनी जिल्ह्याची राजकीय नाडी, प्रशासनाची दोरी आणि सत्तेची श्वासवाहिनी आपल्या हातात ठेवली आहे. जो कोणी तटकरे यांना हलक्यात घेतो, तो इतिहासात “एक होता नेता” म्हणूनच नोंदवला जातो, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
इतिहास साक्षी आहे : तटकरे यांच्याशी पंगा म्हणजे “करेक्ट कार्यक्रम”
माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्यासारखा दिग्गज नेता असो, अशोक साबळे, माणिक जगताप किंवा मधुशेठ ठाकूर असोत सर्वांनी कधी ना कधी तटकरे यांच्याशी राजकीय वैर घेतले.त्यानंतर त्यांच्या राजकीय कारकीर्दीला कधी उतरण लागली, हे त्यांनाही कळले नाही. अगदी अलीकडच्या काळात जयंत पाटील यांचा विधान परिषदेचा मार्ग बंद झाल्याची चर्चा असो, रायगडमध्ये सत्तेच्या चाव्या कुणाकडे आहेत, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
आजचे ‘तीन शिलेदार’ आणि उद्याचा इतिहास
आज सुनील तटकरे यांच्याविरोधात उभे ठाकलेले चेहरे म्हणजे शिवसेना (शिंदे गट) आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री भरत गोगावले.
यात दळवी आणि थोरवे यांची भाषा कडवट, टोकाची आणि वैयक्तिक टीकेकडे झुकलेली दिसते. भरत गोगावले मात्र तुलनेने संयमी, प्रगल्भ आणि राजकीय समज असलेले नेते वाटतात. तरीही या तिघांनी थेट तटकरे यांना अंगावर घेतले आहे. हा संघर्ष वैचारिक नाही, धोरणात्मक नाही तर
तो आहे सत्ताकेंद्र कोणाचे? या प्रश्नावर आधारित.
पालकमंत्री पद : प्रतिष्ठेचा मुद्दा की अहंकाराचा?
रायगड जिल्ह्याला अद्याप पालकमंत्री मिळालेला नाही. शिवसेनेच्या आमदारांचा ठाम विरोध आहे की हे पद तटकरे कुटुंबाकडे जाऊ नये. विशेषतः आदिती तटकरे यांच्याकडे पालकमंत्रीपद जाऊ नये, ही त्यांची आक्रमक भूमिका आहे.
मात्र प्रश्न असा आहे की राज्याच्या राजकारणात वजन कुणाचे आहे? आणि रायगडची जबाबदारी प्रत्यक्षात कोण पेलू शकतो? पालकमंत्रीपद हे केवळ पद नाही; ते जिल्ह्यावर नियंत्रण ठेवण्याचे प्रभावी साधन आहे. आणि हे साधन तटकरे यांच्याकडून हिरावून घेणे इतके सोपे नाही, हे अनेकांनी अनुभवले आहे.
राजकारणात पंगा घ्यावा, पण गणित समजून!
राजकारण म्हणजे संघर्ष. पण संघर्ष कोणाशी करायचा, किती करायचा आणि केव्हा माघार घ्यायची हे ज्याला कळते, तोच खरा नेता ठरतो.
सुनील तटकरे हे केवळ सत्ताधारी नेते नाहीत.
ते व्हिजनरी, प्रचंड महत्त्वाकांक्षी आणि
समोरच्याला चारही मुंड्या चित करण्याची क्षमता असलेले धुरंदर राजकारणी आहेत.
आज जे तटकरे यांना अंगावर घेत आहेत, त्यांनी एकदा तरी रायगडचा राजकीय इतिहास शांतपणे वाचावा. कारण रायगडमध्ये सत्ता बदलते, आघाड्या बदलतात…पण तटकरे फॅक्टर कायम असतो.
बाकी…
इतिहास नेहमीच निकाल देतो.
आणि तो निकाल बहुतेक वेळा निर्दयी असतो.
राजकारणात महत्त्वाकांक्षा असणे गैर नाही; उलट तीच पुढे जाण्याची प्रेरणा ठरते. मात्र केवळ महत्त्वाकांक्षा पुरेशी नसते. स्वतःचे राजकीय कसब सातत्याने सिद्ध करणे, संघटनात्मक ताकद उभी करणे, प्रशासनावर विश्वासार्ह वर्चस्व प्रस्थापित करणे, जनतेच्या भावना समजून त्यांचा आदर राखणे आणि विकासाभिमुख, सामाजिकदृष्ट्या संवेदनशील धोरणांची अंमलबजावणी करणे या सर्व घटकांची सांगड घातली, तर कोणताही राजकारणी शिखरावर पोहोचू शकतो, यात शंका नाही.
……

Related Articles

Back to top button