ताज्या बातम्या
“रात्री ३ वाजता अटक, सकाळी सुटका आणि नंतर ठाम भाषण: अविनाश जाधवांचा ११ तासांचा नाट्यमय प्रवास”

मुंबई | प्रतिनिधी: मीरा भाईंदरमध्ये मराठी व्यापाऱ्यावर झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांना मध्यरात्री ताब्यात घेण्यात आले. तब्बल ११ तासांनंतर त्यांची सुटका झाली आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर आपल्या अनुभवांचा पाढा वाचला.
जाधव म्हणाले, “मध्यरात्री ३ वाजता पोलिसांनी मला घरातून उचललं. प्रथम मीरा भाईंदर, नंतर खंडणीच्या कार्यालयात नेलं आणि त्यानंतर दोन तासांनी मला थेट पालघरच्या टोकाला घेऊन गेले. ही कारवाई अनावश्यक होती.”
त्यांनी आरोप केला की, “दीड ते दोन हजार मराठी कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं. जर परप्रांतीय व्यापारी मोर्चा काढू शकतात, तर आम्ही भूमिपुत्र असूनसुद्धा आम्हाला परवानगी का नाकारली?”
जाधव यांनी स्पष्ट केलं की पोलिसांकडून चुकीची माहिती पसरवली जात आहे. “आमच्याशी रूटबाबत कोणतीही चर्चाच झाली नाही. हे सर्व स्थानिक आमदार व गृहखात्याच्या दबावाखाली केलं गेलं,” असा आरोप त्यांनी केला.
“मराठी माणूस एकवटला आहे,” हे दाखवून देणारा हा मोर्चा यशस्वी ठरला, असं सांगत त्यांनी सरकारवर टीका केली. “अधिवेशनाच्या काळात मराठी जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला, पण तो अपयशी ठरला,” असं ते म्हणाले.