आंबेनळी घाट मार्ग वाहतूक बंद : १० ते १४ जुलैदरम्यान दगड-माती हटवण्याचे काम

रायगड : पोलादपूर–महाबळेश्वर (आंबेनळी घाट) मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात दगड, गोटे व माती रस्त्यावर साचल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. ही अडथळा हटवण्याची कामे ४ दिवस चालणार असल्याने १० जुलै ते १४ जुलै २०२५ या कालावधीत सदर मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार असल्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.
रस्ता बंद ठेवण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक, रायगड आणि तहसीलदार पोलादपूर यांनी शिफारस केली होती. त्यानुसार प्रशासनाने खात्री करून ही कार्यवाही केली आहे.
या कालावधीत नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पोलादपूर – माणगाव – ताम्हीणी घाट मार्गे पुणे–सातारा किंवा पोलादपूर – चिपळूण – पाटण – सातारा – कोल्हापूर मार्ग हे पर्यायी मार्ग म्हणून वापरण्यात यावेत.
प्रशासनाकडून दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, नागरिकांनी सहकार्य करावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.