राज्यात सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे शेतीला दिवसा वीज; शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढले – पंतप्रधान नरेंद्र मोदी

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
मुंबई, दि. २५ : राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होत असून त्याचा थेट फायदा शेतीच्या उत्पादनात आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीत होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट होत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मात्र शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीऐवजी नैसर्गिक शेती आणि झिरो बजेट फार्मिंगवर भर द्यावा, असेही आवाहन त्यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील २,४५८ मेगावॅट क्षमतेच्या ४५४ सौर ऊर्जा प्रकल्पांचे लोकार्पण केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. राजस्थानमधील बांसवाडा येथे ऊर्जा व विकास योजनांचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला. त्याचे ऑनलाईन प्रक्षेपण बांद्रा येथील प्रकाशगडवरून झाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे शेतीला दिवसा पाणी उपलब्ध होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे. आता शेतकऱ्यांनी तेलबिया व बाजरीसारख्या पिकांवर भर द्यावा, ज्यामुळे देशाची खाद्यतेल आयात कमी होईल आणि शेतकरी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील.
या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी स्वतःच्या यशोगाथा पंतप्रधानांना सांगितल्या. नाशिक जिल्ह्यातील सुनील काकुलते यांनी ४० एकर जमीन सिंचनाखाली आणल्याने वार्षिक दोन लाख रुपयांचे उत्पन्न वाढल्याचे सांगितले. अकोल्यातील तुषार वानखेडे यांनी पपई व केळीच्या लागवडीमुळे उत्पन्न दुप्पट झाल्याची माहिती दिली. जालना, पुणे, धुळे, सातारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनीही प्रकल्पामुळे झालेल्या बदलांची उदाहरणे दिली.
राज्यातील प्रगती
पीएम कुसुम सी – मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत सहा लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली आहे. या योजनेमुळे ३२.०८ लाख एकर जमीन ओलिताखाली आली आहे. तसेच आतापर्यंत ६.४६ लाख सौर कृषी पंप बसविण्यात आले असून राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.




