ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
“राजा केणींवर शेकापचा घणाघात : 35 वर्षांचा ठोकून दिला हिशेब, ‘जनतेचा सन्मान आम्ही जिंकला, तुमची कामगिरी कुठे?’”
“कंपनीलाही इशारा, शिवसेनेलाही उत्तर : शेकापचा आक्रमक सुर”

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या टीकेला शेतकरी कामगार पक्षाने झणझणीत प्रत्युत्तर दिलं आहे. गेल्या 35 वर्षांत शेकापने काय केलं, असा सवाल करणाऱ्या शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या वक्तव्याला शेकापने अक्षरशः शाल-जो़डे घातले आहेत. कामगार-कष्टकरी, शेतकरी व सर्वसामान्य जनता यांच्यासाठी रातंदिवस केलेल्या कामगिरीची यादीच शेकापने समोर ठेवत, “तुमच्या प्रश्नांची उत्तरं आम्ही कामातून दिलीत, आता लोकांच्या तोंडावर आम्ही शिक्कामोर्तब केलंय,” असा थेट पलटवार केला आहे.
शेकापने फटकारलं की, “पूर्वजांच्या कुबड्या घ्यायच्या नाहीत, पण त्यांचा आदर्श घेऊन आजही आम्ही गावागावात सेवा करतो. शाळा काढल्या, शिक्षण माफक दरात दिलं, नोकऱ्या पैशाशिवाय दिल्या. कोरोना काळात मृतदेह उचलण्यापासून ते धान्य पोचवण्यापर्यंत जनता आमच्या कार्यकर्त्यांवर विसंबली. आज गावोगावी मिळणारा सन्मान, मुलींच्या चेहऱ्यावर वाटलेल्या सायकलीमुळे दिसणारं समाधान—हा आमच्या 35 वर्षांचा खरा अहवाल आहे!”
इतक्यावर न थांबता शेकापने कंपन्यांवरही तोफ डागली. “कंपन्यांची जुनी ढोंगी पद्धत आम्हाला माहिती आहे. आधी होकार, मग शब्द फिरवायचा. यावेळी मात्र 100% लिखित घ्यायलाच हवं. प्रदूषणग्रस्तांना कायमस्वरूपी मदत, स्थानिकांना पर्मनंट रोजगार, CSR निधी गावांवर खर्च—ही अट कंपनीने नाकारायचीच नाही. अन्यथा जनता गेल प्रकल्पग्रस्तांसारखी फसवली जाणार नाही,” असा इशारा शेकापने दिला.
राजा केणी यांच्या वक्तव्याला हे प्रत्युत्तर म्हणजे शेकापची आक्रमक पाटी आहे. “आम्ही कर्मचारी नाही, आम्ही कार्यकर्ते आहोत. आणि कार्यकर्त्यांच्या घामाचा हिशेब जनता करते, नेता नव्हे,” असं सांगत शेकापने केणींना सरळ मैदानात उतरवलं आहे.




