युवा कौशल्यातून राष्ट्रनिर्मितीस प्रेरणा – सहाय्यक आयुक्त अमिता पवार

अलिबाग : जागतिक युवा कौशल्य सप्ताहाच्या औचित्याने रायगड जिल्ह्यात ८ व ९ जुलै २०२५ रोजी कौशल्यवृद्धी व क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन सहाय्यक आयुक्त अमिता पवार (जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अलिबाग) यांच्या हस्ते सहाण-अलिबाग येथे संपन्न झाले.
उद्घाटन प्रसंगी पवार म्हणाल्या, “युवा कौशल्यातून सकारात्मक राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा मिळते.” अध्यक्ष डॉ. नितीन गांधी यांनी आत्मनिर्भर भारतासाठी अशा प्रशिक्षणाची नितांत गरज असल्याचे मत मांडले. उपाध्यक्षा रत्नप्रभा बेल्हेकर यांनी अधिकाधिक लाभार्थ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. संचालक डॉ. विजय कोकणे यांनी “व्होकल फॉर लोकल” संकल्पनेसाठी जे.एस.एस. रायगड व सीएसआर जेएनपीटी मुंबई यांचे योगदान अधोरेखित केले.
कार्यशाळेमध्ये जिल्हा कौशल्य विकास केंद्र, जन शिक्षण संस्था रायगड व सीएसआर जेएनपीटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कौशल्य प्रशिक्षण उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये साधनव्यक्ती, विद्यार्थी व कर्मचारी यांचा समावेश आहे.
सप्ताहभर (९ ते १५ जुलै २०२५) विविध ठिकाणी उपक्रम होणार असून, उद्घाटनप्रसंगी नेताजी खडगावे, सिद्धी गोळपकर, संकेत मोरे, नरेन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सकाळच्या सत्रात उज्ज्वला चंदनशिव (संस्थापक, उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था) यांनी “योगसाधना” या विषयावर प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन केले.