ताज्या बातम्या
मोर्चाला परवानगी नाकारून सरकारची बदनामी?; मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांकडे मागितला स्पष्टीकरणाचा अहवाल

मीरा-भाईंदर : मराठी अस्मिता आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावर मनसे व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या दोन्ही पक्षांनी मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा काढण्याचे आयोजन केले होते. सकाळी बालाजी हॉटेलपासून मीरारोड रेल्वे स्टेशनपर्यंत हा मोर्चा नियोजित होता. मात्र, याआधीच पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या होत्या. विशेष म्हणजे पहाटे साडेतीन वाजता मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच वसई-विरार परिसरातील अनेक कार्यकर्त्यांवरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात राजकीय तापमान वाढले होते. एक गंभीर सवाल उपस्थित केला जात आहे – जेव्हा अमराठी व्यापाऱ्यांचा मोर्चा काढला जातो, तेव्हा कुठलीही कारवाई होत नाही; मग मराठी जनतेचा मोर्चा का रोखला जातो?
या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेत राज्याचे पोलीस महासंचालकांकडे नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, “मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारून सरकारची बदनामी करण्याचा कोणाचा हेतू होता का?” या दृष्टीने चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याचेही समजते.
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीसुद्धा पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. त्याबाबत अविनाश जाधव यांनी प्रताप सरनाईक यांचे कौतुक केले आहे.
फडणवीस काय म्हणाले?
माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “मोर्चासाठी पोलिसांनी आधीच निश्चित रूट दिला होता. मात्र मनसेकडून जाणूनबुजून वाद निर्माण होईल अशा रूटची मागणी करण्यात आली. त्यामुळेच पोलिसांनी परवानगी नाकारली.”
फडणवीस यांनी हेही स्पष्ट केले की, “मनसे आणि पोलिसांमध्ये मार्गावरून सुरू असलेला संवाद काही तासांपूर्वीपर्यंत सुरू होता, परंतु मनसेने आपल्या अटी कायम ठेवल्याने परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना निर्णय घ्यावा लागला.”