ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन “मोदींचा हात लागला की सोनं होतं” — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय ग्रीनफिल्ड विमानतळाचे भव्य उद्घाटन पार पडले. “मोदींचा जिथे हात लागतो, तिथे सोनं होतं; नवी मुंबई विमानतळ हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे,” अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी बोलताना शिंदे म्हणाले, “विविध विमानं टेक-ऑफ आणि लँडिंग करतात, पण भारताला आत्मनिर्भर आणि महासत्ता बनवण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी 2014 साली टेक-ऑफ घेतलं. प्रगती आणि विकास हे हातात हात घेऊन येतात, आणि जेव्हा उड्डाणाबद्दल बोलतो तेव्हा मोदीजींचीच आठवण होते. हे केवळ विमानतळ नाही, तर ‘नवीन भारत’ घडविणाऱ्या महाराष्ट्राच्या विश्वासाचे प्रतीक आहे.”

शिंदे यांनी पुढे सांगितले की, “मोदीजींनी जबाबदारी स्वीकारली तेव्हा देशात केवळ 74 विमानतळ होते. गेल्या दहा वर्षांत ही संख्या दुपटीहून अधिक वाढून 150 वर पोहोचली असून, 2030 पर्यंत ती 220 करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. हे आकडे केवळ विकासाचे नाहीत, तर देशाच्या आत्मविश्वासाचे प्रतीक आहेत. मोदीजी ‘तो मुमकिन है’ असं उगाच म्हणत नाहीत.”

उपमुख्यमंत्री म्हणाले, “आज नवी मुंबई विमानतळाची तुलना लंडनच्या हिथ्रो विमानतळाशी केली जाते. पण लवकरच हिथ्रोची तुलना नवी मुंबई विमानतळाशी केली जाईल, असा मला विश्वास आहे.” त्यांनी या प्रकल्पाचे स्वप्न साकार करणाऱ्या सिडको आणि नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे अभिनंदनही केले.

शिंदे यांनी पुढे सांगितले, “देशातील सर्वात लांब भुयारी मेट्रो प्रकल्पाचे लोकार्पणही नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. मुंबई मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला हिरवा झेंडा दाखवणारेही मोदीजीच होते. लवकरच सर्व मेट्रो लाईन कार्यान्वित होतील आणि मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत फक्त एका तासात पोहोचता येईल. हे फक्त महायुती सरकारच करू शकते.”

शिंदे यांनी विरोधकांवर टीका करताना म्हटलं, “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू झालेल्या अनेक विकास प्रकल्पांना महाविकास आघाडी सरकारने ब्रेक लावला होता. मात्र, 2022 मध्ये महायुती सत्तेवर आल्यानंतर आम्ही सर्व अडथळे दूर करून हे प्रकल्प मार्गी लावले. आज महाराष्ट्राचा विकासपट पुन्हा गती घेत आहे.”

“मोदीजींच्या आशीर्वादाने देशातील प्रमुख पायाभूत प्रकल्प महाराष्ट्रात साकार होत आहेत. पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने तब्बल 32 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. ‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही’ हा दिलेला शब्द आम्ही पाळला,” असंही शिंदे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “पीएम किसान सन्माननिधी योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत 33,565 कोटी रुपये वितरित झाले आहेत. विरोधकांनी हे आकडे पाहावेत, त्यानंतरच बोलावं,” अशी टीका त्यांनी केली.

काँग्रेसवर निशाणा साधत शिंदे म्हणाले, “2004 पासून काँग्रेस सरकारने महाराष्ट्राच्या विकासासाठी केवळ दोन लाख कोटी रुपये दिले, पण गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने तब्बल दहा लाख कोटी रुपये राज्याला दिले आहेत. मोदीजींचे हात देणारे आहेत; काँग्रेसचे हात ओरबाडणारे आहेत. काँग्रेसचं धोरण ‘करप्शन फर्स्ट’, तर मोदीजींचं ‘नेशन फर्स्ट’ आहे. देश आज ‘बरबादीपासून विकासाच्या आंधीकडे’ वाटचाल करत आहे, आणि याचं श्रेय नरेंद्र मोदींनाच जातं.”

शेवटी शिंदे म्हणाले, स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जनतेच्या कल्याणाचा झेंडा हाती घेतलेली महायुतीच विजयी होईल. ‘आनंदात ठेव इथला वारकरी, शेतकरी आणि कष्टकरी, लाडक्या बहिणींचा आशीर्वाद भारी, आणि मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र घेईल उत्तुंग भरारी!

या कार्यक्रमाला राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री राम नायडू, मुरलीधर मोहोळ, रामदास आठवले, उद्योगपती गौतम अदानी तसेच अनेक खासदार आणि आमदार उपस्थित होते.


Related Articles

Back to top button