मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान गावांच्या विकासासाठी लोकाभिमुख – आदिती तटकरे

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : ग्रामविकास मंत्रालयामार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत राज्यभर राबविण्यात येणार आहे. गावांचा शाश्वत व सर्वांगीण विकास करण्यासाठी ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असून या अभियानातून गाव सक्षम झाल्यास जिल्हा, राज्य आणि देश सक्षम होईल, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

कुरुळ येथील आरसीएफ सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या. या वेळी रोहयो मंत्री भरत गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी, सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री तटकरे यांनी सांगितले की, ग्रामपंचायत म्हणजे शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी साधन आहे. या अभियानात गावांची स्वच्छता, जलसमृद्धी आणि ग्रामस्थांच्या सामूहिक सहभागातून विकासावर भर दिला जाणार आहे.
रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्ह्यातील 507 ग्रामपंचायतींमध्ये सेतू केंद्र सुरू असून ग्रामस्थांना आवश्यक दाखले सहज उपलब्ध होत असल्याची माहिती दिली. तसेच प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत किमान एक हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड सुरू असल्याने ग्रामपंचायतींना आर्थिक उत्पन्नाचा नवा स्रोत मिळेल, असे त्यांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेतील स्पर्धेमुळे अभियान अधिक प्रभावीपणे राबवता येईल, असे मत व्यक्त केले. यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सरपंच व अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना हा निर्णय सर्वांच्या चर्चेनंतर घेण्यात आला असल्याचे स्पष्ट केले.





