ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

मुंबईत महायुतीची नामुष्की! अर्ज बाद होताच दोन वॉर्डमधून थेट रिंगणाबाहेर – भाजपची मोठी प्रशासकीय चूक की जाणीवपूर्वक ‘वॉकओव्हर’?


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
मुंबई : महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपून अवघे 24 तास उलटत नाहीत, तोच सत्ताधारी महायुतीला मोठा राजकीय धक्का बसला आहे. मुंबईतील वॉर्ड क्रमांक 211 आणि 212 मध्ये भाजप आणि शिव सेना यांचा एकही उमेदवार रिंगणात नसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजेच मतदानापूर्वीच या दोन प्रभागांमधून महायुतीची दणदणीत माघार असल्याचे दिसून येते.
कागदपत्रे अपुरी, वेळेची गफलत – पण जबाबदार कोण?
वॉर्ड 211 मध्ये भाजपचे उमेदवार शकील अन्सारी यांचा अर्ज कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने थेट बाद झाला. तर वॉर्ड 212 मध्ये भाजपच्या मंदाकिनी खामकर या एबी फॉर्म मिळूनही अवघ्या 15 मिनिटे उशिरा अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचल्या. नियमांवर बोट ठेवत निवडणूक यंत्रणेने अर्ज स्वीकारण्यास साफ नकार दिला.
प्रश्न असा आहे की, सत्ताधारी पक्षाला मूलभूत निवडणूक प्रक्रिया सांभाळता येत नसेल, तर शहराचे प्रशासन कसे चालवणार?
चूक की रणनीती? ‘बाय’ दिल्याची जोरदार चर्चा
सलग दोन वॉर्डमध्ये अर्जच बाद होणे ही साधी चूक मानायची का? की भाजपने जाणीवपूर्वक इतर पक्षांना मोकळे रान दिले? राजकीय वर्तुळात ‘बाय’ दिल्याची चर्चा रंगू लागली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही वॉर्डमध्ये महायुतीचा एकही पर्यायी उमेदवार नसणे ही बाब अधिकच संशयास्पद ठरते.
ठाकरे बंधूंच्या एकत्रित ताकदीसमोर भाजप गायब!
वॉर्ड 212 मध्ये ठाकरे बंधूंच्या आघाडीकडून मनसेच्या श्रावणी हळदणकर मैदानात उतरल्या आहेत. काँग्रेससह अन्य उमेदवार असले तरी ठाकरे बंधूंच्या एकत्रित ताकदीमुळे श्रावणी हळदणकर यांचे पारडे जड मानले जात आहे. त्यामुळे मुंबईत मनसेला पहिल्या विजयाची चाहूल लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
एका बाजूला मुंबईत फजिती, दुसऱ्या बाजूला राज्यात बिनविरोध विजय
मुंबईत भाजपचा हा भ्रमनिरास होत असतानाच, राज्यातील अन्य महानगरपालिकांमध्ये मात्र भाजपचे चार नगरसेवक मतदानाआधीच विजयी झाले आहेत.
कल्याण-डोंबिवली: रेखा चौधरी, आसावरी नवरे
पनवेल: नितीन पाटील, धुळे: उज्ज्वला भोसले
विरोधकच नसल्याने हे विजय बिनविरोध झाले असले, तरी मुंबईसारख्या राजधानीत थेट दोन वॉर्ड गमावणे ही बाब भाजपसाठी निश्चितच राजकीय लाजिरवाणी आहे.
महायुतीला उमेदवारी अर्ज भरताना शिस्त ठेवता येत नसेल, तर मुंबईकरांनी त्यांच्या हातात शहराची सूत्रे द्यायची का? मुंबईतील या घडामोडींमुळे निवडणूक रणधुमाळीला आता नवे वळण मिळाले असून, पुढील दिवसांत राजकीय आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
…..

Related Articles

Back to top button