माथेरानमध्ये ई-रिक्षा सुरू करण्याची कार्यवाही गतीने करा – पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : माथेरान हे राज्यातील एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ असून, पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देण्यासाठी ई-रिक्षा सुरू करण्याची कार्यवाही स्थानिक प्रशासनाने गतीने करावी, अशा सूचना पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या आहेत. सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे माथेरान येथील पर्यटनविषयक पायाभूत सुविधा आणि स्थानिक समस्या या विषयावर आयोजित आढावा बैठकीत मंत्री देसाई बोलत होते.
बैठकीला आमदार महेंद्र थोरवे, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, श्रमिक रिक्षा चालकमालक संघटनेचे सचिव सुनील शिंदे, माजी नगरसेवक शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते.
पर्यटनमंत्री देसाई म्हणाले की, माथेरान हे पर्यावरण संवेदनशील क्षेत्र असल्यामुळे पारंपरिक वाहनांऐवजी ई-रिक्षा सुरू करणे अत्यावश्यक आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचे निर्देश दिल्याने संबंधित विभागांनी तातडीने कृती आराखडा तयार करून अंमलबजावणी करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढे सांगितले की माथेरानसारख्या संवेदनशील पर्यटनस्थळांवर पर्यावरणपूरक वाहतुकीचा अवलंब केल्यास पर्यावरण संवर्धनासह पर्यटकांचा अनुभवही अधिक सकारात्मक होईल.
दरवर्षी लाखो पर्यटक माथेरानला भेट देतात. या पार्श्वभूमीवर स्थानिक पायाभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण होणे अत्यावश्यक असल्याचे मंत्री देसाई म्हणाले. वाहनतळासाठी आरक्षित भूखंड महाराष्ट्र रस्ते विकास प्राधिकरणाने विनामोबदला माथेरान नगरपरिषदेकडे हस्तांतरित करावा तसेच त्या ठिकाणावरील अतिक्रमणे त्वरित हटवावीत, असेही त्यांनी आदेश दिले.
माथेरान पर्यावरण संवेदनशील सनियंत्रण समितीने ऑनलाईनसह ऑफलाईन बैठका नियमितपणे घेऊन प्रलंबित विषयांवर निर्णय घ्यावेत, अशा सूचनाही पर्यटनमंत्र्यांनी दिल्या. माथेरानमधील ई-रिक्षा प्रकल्प राबविला गेल्यास तो पर्यावरण रक्षण, स्वच्छ वाहतूक आणि स्थानिक रोजगार वाढीसाठी एक आदर्श उपक्रम ठरेल, असा विश्वास पर्यटन मंत्रालयाने व्यक्त केला आहे.




