“मातोश्रीवर ‘राज’कारणाची सलामी! — ठाकरे बंधू पुन्हा एकत्र?”
राज ठाकरेंनी दिल्या उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज संपूर्ण राज्यातून शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर गर्दी केली असताना, या दिवशी घडलेल्या काही भेटी आणि प्रतिक्रियांनी राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण केला आहे.
या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः मातोश्री गाठून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हा क्षण ‘ठाकरे विरुद्ध ठाकरे’ युगाच्या इतिहासात वळण घेणारा ठरेल का, असा सवाल आता राजकीय वर्तुळात विचारला जातोय. भाऊ म्हणून दुरावलेले राज आणि उद्धव आज एकत्र आले, आणि यामुळेच पुन्हा एकदा दोघांमधील संबंधांवर राजकीय रंग चढताना दिसतोय.
या भेटीनंतर, भाजपमधील ‘संकटमोचक’ म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांनीही उद्धव ठाकरेंना फोनवरून शुभेच्छा दिल्या. बोलणं न झालं तरी “वाढदिवस वेगळा प्रसंग असतो, सतत भांडत राहणं आवश्यक नाही”, असं म्हणत त्यांनी राज ठाकरे यांच्या भेटीचं समर्थन केलं. “हळूहळू मनमिळावूपणा वाढतोय,” असं सूचक विधान त्यांनी केलं.
दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांनीही या भेटीला उघड पाठिंबा दिला. “राज आणि उद्धव एकमेकांचे भाऊ आहेत, राज त्यांना ‘दादू’ म्हणायचे. वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र आले असतील तर त्यात नवल काही नाही, उलट आनंदच आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
परंतु या शांत आणि सौहार्दाच्या चर्चांदरम्यान, एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल यांना पुणे पोलिसांनी एका रेव्ह पार्टीतून ताब्यात घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली. मध्यरात्री झालेल्या या कारवाईत त्यांच्यासह अन्य काही जणांनाही अटक करण्यात आली असून सर्वांचे वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. यावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देताना सुद्धा सावध भूमिका घेतली.