ताज्या बातम्यारायगड
धबधब्यांवर बंदीचा बडगा, स्थानिकांच्या उपजीविकेला धक्का; नियोजनाऐवजी थेट मनाई?”

रायगड : धबधबे आणि धरण परिसरात गर्दीवर बंदी घालण्याच्या निर्णयामुळे पर्यटकांची सुरक्षा जपली जात असली, तरी या आदेशाने स्थानिक पर्यटन व्यवसायावर घाला घातला आहे, अशी संतप्त भावना गावकऱ्यांमध्ये आहे. वर्षानुवर्षे या पर्यटनस्थळांवर छोट्या व्यवसायांमधून उपजीविका करणाऱ्या नागरिकांचे आर्थिक संसार डळमळीत झाले असून, प्रशासनाने थेट बंदी घालण्यापेक्षा नियोजन, देखरेख आणि सुविधा यांवर भर द्यायला हवा होता, असा ठपका स्थानिकांकडून ठेवण्यात येत आहे. त्यामुळे आता केवळ नियम न लावता सुवर्णमध्य साधत निर्णय घ्यावा, अशी तीव्र मागणी समोर येत आहे.
या ठिकाणी होणाऱ्या संभाव्य दुर्घटनांपासून बचाव करण्यासाठी २६ जून ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीसाठी भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.
श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी महेश पाटील यांनी हा आदेश जारी केला असून, या आदेशांतर्गत धरणे, धबधबे, तलाव तसेच आजूबाजूच्या नैसर्गिक ठिकाणी खालीलप्रमाणे विविध कृतींवर बंदी घालण्यात आली आहे:
मद्यसेवन, मद्य बाळगणे व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश
धोकादायक ठिकाणी सेल्फी, फोटो, किंवा व्हिडिओ चित्रीकरण
खोल पाण्यात उतरणे, पोहणे, धबधब्याखाली बसणे
वाहतुकीस अडथळा ठरतील अशा ठिकाणी वाहने थांबवणे, अति वेगात वाहन चालवणे
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, प्लास्टिक वापरणे
महिलांशी असभ्य वर्तन, छेडछाड, शेरेबाजी
ध्वनी प्रदूषण करणारी संगीतयंत्रणा किंवा गाडीतील स्पिकर
प्रदूषण निर्माण करणाऱ्या कोणत्याही कृती
धबधबा/धरण परिसरात 1 कि.मी. अंतरात वाहन प्रवेश (अत्यावश्यक सेवेवगळता)
विशेषतः, कारविणे येथे १७ जून रोजी धबधब्याच्या पाण्यात बुडून घडलेली मृत्यूची घटना लक्षात घेता, अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून हा आदेश देण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी या आदेशाचे गांभीर्याने पालन करावे, अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा श्रीवर्धन उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.
……