‘मातृभाषेसाठी सरकारची साथ’ – अमेरिकेतील मराठी शाळांना मिळणार सरकारी अभ्यासक्रम

मुबंई : महाराष्ट्र सरकारकडून अमेरिकेतील मराठी शाळांना अभ्यासक्रमाची मदत केली जाईल, असे आश्वासन राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी दिले आहे.
अमेरिका दौऱ्यावर असलेले शेलार सध्या कॅलिफोर्नियामधील सॅन फ्रान्सिस्को येथील बे एरियामध्ये असून, तेथे मराठी शाळा चालवणाऱ्या महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी नुकतीच भेट घेतली.
सन २००५ पासून या परिसरात कार्यरत असलेल्या या मराठी शाळेत सुमारे ३०० विद्यार्थ्यांना मातृभाषा, महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास आणि लोकपरंपरांचा परिचय दिला जातो. अमेरिकेत अशा ५० पेक्षा अधिक मराठी शाळा कार्यरत असून त्या स्थानिक मराठी नागरिकांकडून सेवाभावाने चालवल्या जातात.
या शाळांचे पदाधिकारी म्हणाले की, स्थानिक प्रशासनाकडून मराठीला मान्यता मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शिफारस करावी आणि अधिकृत अभ्यासक्रम उपलब्ध करावा. त्यामुळे मराठी शिकवणे, परीक्षा घेणे आणि प्रमाणपत्र देणे अधिक सुलभ होईल.
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना शेलार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे यांच्याशी चर्चा करून शासनाकडून आवश्यक शिफारस व अभ्यासक्रम लवकरच पुरवला जाईल.