ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय

“महिलांचा अपमान भाजपच्या घरातच गुदमरला – मग रस्त्यावरचा संताप कसला?”

“भाजप महिलांचा मोर्चा : आंदोलन की दुटप्पी नाटक?


फडशा
आविष्कार देसाई
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड :  महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा पाटील यांच्या नेतृत्वात भाजप महिला मोर्चा आज पेझारी येथील रस्त्यावर उतरला होता. काँग्रेसने नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मातोश्रींवर अवमानास्पद व्हिडिओ केला, असा त्यांचा आरोप आहे. आज देशभरात घोषणाबाजी, मोर्चा, संतापाचा स्फोट झाला. पण खरा सवाल असा आहे की भाजपला दुसऱ्यांच्या चुका दिसतात, मात्र स्वतःच्या पापाचा आरसा कधी दिसत नाही.
कोणत्याही महिलेचा अपमान अथवा त्यांच्यावर केलेला अत्याचार हे निषेधार्य आहे. त्याच कोणीच समर्थन करू शकणार नाही.
भाजप नेत्यांची महिलांविरोधातील अपमानाची यादी इतकी मोठी आहे की, पुस्तकं छापली तरी कमी पडतील. खुद्द नरेंद्र मोदींनी सोनिया गांधींना “विधवा” म्हटलं, सुनंदा पुष्कर यांचा अपमान केला, “५० कोटींची गर्लफ्रेंड” असा गलिच्छ उल्लेख केला. महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील सुप्रिया सुळेंना “घरात जा, स्वयंपाक करा” म्हणतात. कैलाश विजयवर्गीय मुलींची तुलना शूर्पणखाशी करतात. भाजपचे बंगालमधील अभिजित गांगुली ममता बॅनर्जींबाबत “ही स्त्री आहे का?” असं घाणेरडं वक्तव्य करतात.
मग महिलांचा अपमान झाला नाही का? की भाजपला फक्त विरोधकांनी बोललं तरच अपमान दिसतो?
उन्नाव, कठुआ, हाथरससारख्या बलात्कार प्रकरणांत भाजप आरोपींच्या पाठीशी उभा राहिला. भाजपचे तब्बल ४४ खासदार-आमदारांवर बलात्कार, छेडछाड, अत्याचाराचे आरोप आणि पुण्यात तर शहराध्यक्षावर महिला पोलीस अधिकाऱ्याशी अश्लील वर्तनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळत आहे. हा भाजपचा “बेटी बचाओ” आहे का की “आरोपी बचाओ”?
कालपर्यंत शेकापमध्ये बसून भाजपवर शरसंधान करणाऱ्या चित्रा पाटील आज भाजपच्या बाजूने मोर्चा काढतात. पक्षांतर केलं म्हणजे ठीक आहे, पण भाजपला लगेच डोक्यावर घ्यायचं? भाजपमध्ये जुन्या नेत्यांना ही स्थान मिळायला वर्षानुवर्षं लागतात. प्रशांत ठाकूर यांचं उदाहरण समोर आहे. तीन वेळा सलग निवडून आले तरी मंत्रीपद नाही, फक्त थोडंफार सिडकोचे अध्यक्षपद. याचा विसर चित्रा पाटील यांनी होऊन देऊ नये, इतकीच माफक अपेक्षा आहे.
एवढा उत्साह महिलांच्या सन्मानासाठी आहे का? की पक्षात आपली पोळी भाजण्यासाठीचा “सोयीस्कर संताप”? आहे, असाही प्रश्न जनतेच्या मनात विशेष करून महिलांच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही.
भाजप महिला मोर्चा महिलांच्या अपमानावर घरात गप्प राहतो, पण विरोधकांविरुद्ध रस्त्यावर उतरतो. म्हणजे महिलांच्या सन्मानासाठी नव्हे, तर राजकारणाच्या पोळीसाठी हे आंदोलन केले जाते का? सांगायचं झाल तर भाजपचं हे आंदोलन म्हणजे दुटप्पी राजकारणाचं स्वस्त नाटक आणि महिलांच्या सन्मानावरचा थेट विश्वासघात! अस म्हंटल्यास वावगं ठरणार नाही.
दरम्यान, या आंदोलनामध्ये राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार सुभाष उर्फ पंडित पाटील, दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस एडवोकेट महेश मोहिते, रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष एडवोकेट आस्वाद पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button