ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

“महाराष्ट्र वाचवण्यासाठी लाल निखाऱ्यात मिसळलं भगवं वादळ!” — राज ठाकरेंचा घणाघात

महाराष्ट्र वाचवण्याच्या संघर्षाचे नवे प्रहार बिंदू ठरणार


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

आविष्कार देसाई

रायगड : राजकारणाचा रंग जरी बदलला असला, तरी महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई अजून पेटलेलीच आहे! शिवसेनेच्या व्यासपीठावर लाल ध्वज झळकणाऱ्या इतिहासाची आठवण करून देताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता उलट चित्र रंगवलं — “आज लाल व्यासपीठावर भगव्या वादळाचा भडका उडाला आहे, कारण महाराष्ट्र वाचवण्याची वेळ आली आहे!”

शिवसेनेच्या भगव्या व्यासपीठावर लाल ध्वज मिरवण्याच्या इतिहासाचे स्मरण करून, आज लाल व्यासपीठावर भगवे वादळ उसळल्याचे प्रतीक राज ठाकरेंनी दाखवले. मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांचा भगवा ध्वज आणि शेका पक्षाचा लाल बावटा हे एकत्रीकरण महाराष्ट्र वाचवण्याच्या संघर्षाचे नवे प्रहारबिंदू ठरणार असल्याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले.

हिदी लादणाऱ्या सरकारवर, जमिनी गिळणाऱ्या गुंतवणूकदारांवर आणि मराठी माणसाच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर राज ठाकरेंनी थेट घणाघात केला. “मराठी माणसाच्या नशिबावर गदा आणणाऱ्या गद्दारांना आता गप्प बसू देणार नाही!” असा सज्जड इशारा त्यांनी दिला.

राज ठाकरेंनी जनसुरक्षा विधेयकावर देखील टीका करत, “प्रकल्पाला विरोध केला की अटक, हे काय देश आहे का तुरुंग?” असा सज्जड दम भरला.

“गद्दारांना धडा शिकवणार!” – जयंत पाटील यांचा इशारा

शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी पक्ष संघटनेत ८०% तरुण नेतृत्व तयार केल्याचा दावा करत, “ज्यांना संधी दिली त्यांनी गद्दारी केली, आता त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे,” असे ठणकावले. त्यांनी महाविकास आघाडी व इंडिया आघाडीला बळकटी देण्यासाठी शेकापचा मोलाचा सहभाग असेल असेही स्पष्ट केले.

या प्रसंगी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे,  आमदार बाबासाहेब देशमुख, मनसेचे माजी आमदार राजू पाटील, बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, नितीन सरदेसाई, माजी आमदार बाळाराम पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया पाटील, राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, कामगार आघाडी प्रमुख प्रदीप नाईक, रायगड बाजार समितीचे चेअरमन नृपाल पाटील, जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, संतोष जंगम, जिल्हा महिला आघाडी प्रमुख शिवानी जंगम आणि रायगडसह राज्यातील विविध तालुक्यांतील शेकापचे पदाधिकारी, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

….

 

 

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button