ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

महाराष्ट्र पेटला – जुलमी जनसुरक्षा विधेयकाविरोधात जनतेचा प्रचंड उद्रेक!


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

मुंबई : महाराष्ट्रात आज जनतेचा प्रचंड उद्रेक उसळला. सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीच्या गळ्यात घातलेला फास म्हणजेच ‘महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४’ याविरोधात राज्य पेटून उठले. जनतेच्या हक्कांची गळचेपी करणाऱ्या या काळाकायद्याच्या विरोधात जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समितीच्या हाकेला हजारोंच्या संख्येने लोकांनी प्रतिसाद दिला आणि सर्व ३५ जिल्ह्यांत शंभरपेक्षा अधिक ठिकाणी निर्धार आंदोलन छेडले. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांपाशी जमून नागरिकांनी सरकारचा जाहीर निषेध करत असहकार आंदोलनाचा इशारा दिला.

हे विधेयक मंजूर करण्यापूर्वी तब्बल १३ हजार हरकती दाखल झाल्या होत्या. त्यापैकी ९५०० हरकती या स्पष्टपणे विधेयक रद्द करण्याच्या होत्या. मात्र संयुक्त समितीने जनतेला आपले म्हणणे मांडण्याची संधीही दिली नाही. हा सरळसरळ लोकशाहीचा खून असून बहुमताच्या दडपशाहीने हा काळाकायदा मंजूर करण्यात आला. या जुलमी निर्णयाविरोधात महाराष्ट्र उभा ठाकला आहे.

मुंबईत झालेल्या परिषदेपासून या आंदोलनाची ठिणगी पडली. महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते उद्धव ठाकरे, शरद पवार, हर्षवर्धन सपकाळ, डॉ. कांगो यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ठरलेला निर्धार आज प्रत्यक्ष रस्त्यावर उतरला. डावे पक्ष, समाजवादी, आंबेडकरवादी तसेच जनआंदोलनातील सर्व संघटना एकदिलाने एकत्र आल्या आणि या लढ्याचा बिगुल वाजवला.

सरकारला हुकूमशाही अधिकार देणारा, नागरिकांच्या हक्कांचा गळा घोटणारा हा कायदा आम्ही मान्य करणार नाही, असा लढाऊ गर्जना प्रत्येक जिल्ह्यातून झाला. या कायद्याविरुद्धचा लढा फक्त आंदोलनापुरता मर्यादित राहणार नाही, तर तो सरकारला गुडघे टेकायला लावेल, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.

भाकप, माकप, शेकाप, भाकप (माले), समाजवादी पक्ष, सकप, भारिप (से), भारत जोडो अभियान, श्रमिक मुक्ती दल व जनआंदोलनाची संघर्ष समिती यांनी एकमुखी ठराव घेतला आहे – जोपर्यंत हा काळाकायदा रद्द होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र रस्त्यावरून उठणार नाही.


Related Articles

Back to top button