ताज्या बातम्यारायगड
महाराष्ट्र पर्यटनाच्या ब्रँडिंगला नवे बळ – शासनाचे धोरण लागू, कार्यक्रम आयोजकांना अनुदान, ब्रँडिंगसाठी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सचा वापर

रायगड : राज्यातील पर्यटन क्षेत्राचा प्रसार आणि जागतिक स्तरावर ब्रँडिंग करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दिनांक 30 एप्रिल 2025 पासून एक नविन धोरण राबवले आहे. याअंतर्गत, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील पर्यटनाशी संबंधित खासगी आयोजकांमार्फत होणाऱ्या कार्यक्रमांना सरकारकडून आर्थिक सहाय्य आणि सहकार्य दिले जाणार आहे.
या धोरणाअंतर्गत खाजगी संस्था, स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था आणि अन्य आयोजक पर्यटन व सांस्कृतिक वारसा, साहसी पर्यटन, खाद्य महोत्सव, हस्तकला प्रदर्शन, MICE इव्हेंट्स, डिजिटल मोहिमा, मीडिया टूर, फॅम टूर अशा विविध उपक्रमांचे आयोजन करू शकणार आहेत.
महत्त्वाचे उपक्रम:
ब्रँडिंग आणि विपणन योजना: पर्यटन विभाग दरवर्षी पर्यटनाच्या ब्रँडिंगसाठी स्वतंत्र योजना तयार करेल.
प्रचार माध्यमे: OTT, डिजिटल मीडिया, टीव्ही, रेडिओ, लोकशाहीर, फील्ड इव्हेंट्स यांचा वापर प्रचारासाठी केला जाईल.
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सचा सहभाग: किमान १ लाख फॉलोअर्स असलेल्या इन्फ्लुएंसर्समार्फत महाराष्ट्र पर्यटनाचा प्रचार करण्यात येईल.
उच्चस्तरीय समितीची स्थापना:
पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीत पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी सदस्य म्हणून असतील. ही समिती पात्र संस्थांचे प्रस्ताव मंजूर करेल.
प्रस्ताव सादर करण्यासाठी मार्गदर्शक सूचना:
संस्था नोंदणीकृत असावी.
ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करणे आवश्यक.
प्रस्तावात कार्यक्रमाचे उद्दिष्ट, तपशील, खर्च, प्रचाराचे माध्यम व अपेक्षित परिणाम यांचा समावेश असावा.
मान्य प्रस्तावासाठी वेळेत खर्च विवरणपत्र (Statement of Expenditure) सादर करणे बंधनकारक आहे.
इतर अटी व शर्ती:
पर्यटन विभागाचा लोगो केवळ संमतीनंतर वापरणे.
कार्यक्रम विभागाच्या उद्दिष्टांशी सुसंगत असावा.
मान्यताप्राप्त माध्यमांतून प्रसिद्धी करणे.
पर्यटन विभागाचे प्रतिनिधित्व कार्यक्रमात आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी शासन निर्णय क्र. महोत्सव-2018/12/प्र.क्र.1126/ पर्यटन-3 दि. 30 एप्रिल 2025 आणि संकेतांक 202504301806054523 पाहावा. सदर निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ही योजना महाराष्ट्र पर्यटन क्षेत्राच्या व्यापक प्रचारासाठी आणि नव्या संधी निर्माण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.