“महायुतीमध्ये दंगा नको पण गुन्हेगारांनाही क्षमा नाही” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
पुणे : q“पुण्यातील महिला आणि मुलींना निर्भयपणे फिरता आले पाहिजे, कायदा आणि सुव्यवस्था राखली गेली पाहिजे,” अशी रवींद्र धनगेकरांची मागणी असून, त्यानुसार मी त्यांना ‘महायूतीत दंगा नको’ असे बजावले आहे,” असे शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वतीने पुणे येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘समाज स्नेही’ पुरस्काराने गौरविण्यात आले. या प्रसंगी ते पत्रकारांशी संवाद साधत होते.
“गुन्हेगारांना क्षमा दिली जाणार नाही, त्यांना कदापि पाठीशी घातले जाणार नाही. पुणे गुन्हेगारीमुक्त शहर बनविण्याची अपेक्षा पुणेकरांची आहे, ती आम्ही पूर्ण करू. कायदा व सुव्यवस्था राखणे हे राज्य सरकारचे आणि पोलीस यंत्रणेचे कर्तव्य आहे,” असे शिंदे म्हणाले. त्यांनी सांगितले की, पोलीस आयुक्तांसोबत त्यांची चर्चा झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृह खात्याची जबाबदारी सक्षमपणे पार पाडत आहेत. “गुंडा गर्दी करेल, बळाचा वापर करेल किंवा नागरिकांना भयभीत करेल, तर त्याच्यावर कडक कारवाई होईल. कोणालाही सोडले जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
ब्राह्मण जागृती सेवा संघाकडून मिळालेल्या सन्मानाबद्दल शिंदे म्हणाले, “हा सन्मान मी तळागाळातील कार्यकर्त्यांना समर्पित करतो. समर्पित भावनेने काम करणाऱ्यांनाच असे पुरस्कार मिळतात.”
शेतकऱ्यांविषयी बोलताना शिंदे म्हणाले, “महायुती सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांच्या दिवाळी काळी होऊ देणार नाही, असा शब्द आम्ही दिला आहे आणि तो आम्ही पाळला आहे. बत्तीस हजार कोटी रुपयांचे पॅकेज आम्ही जाहीर केले असून, दिवाळीपूर्वी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




