ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
शिवतीर्थावर परिवर्तनाची नांदी! एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंवर घणाघात; मुंबई महापालिकेतील सत्ताबदलाची महायुतीकडून ठाम घोषणा
25 वर्षे सत्ता असून मराठी माणसासाठी काहीच केलं नाही- एकनाथ शिंदे, मुंबई महापालिकेत महायुतीचाच भगवा फडकणार, मराठीच महापौर होणार

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
मुंबई, ता. 13 :
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थावर झालेली महायुतीची विराट जाहीर सभा ही केवळ निवडणुकीसाठीची प्रचारसभा नसून, मुंबईतील परिवर्तनाची आणि बदलाची ठाम नांदी असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चैत्यभूमी आणि वीर सावरकर स्मारक या तीन महापुरुषांच्या साक्षीने झालेल्या या सभेत शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आणि महायुतीच्या साडेतीन वर्षांच्या कामगिरीचा सविस्तर लेखाजोखा मांडला.
शिंदे म्हणाले की, ही सभा कुणाला टोमणे मारण्यासाठी किंवा टीकेला उत्तर देण्यासाठी नाही, तर गेल्या साडेतीन वर्षांत महायुतीने मुंबईसाठी काय केलं आणि पुढील पाच वर्षांत काय करणार आहे, हे सांगण्यासाठी आहे. “मी कधीही आरोपांना शब्दांनी उत्तर दिलं नाही, नेहमी कामातून उत्तर दिलं आहे. भावनेचं नाही, तर विकासाचं राजकारण मुंबईकरांना अपेक्षित आहे आणि आम्ही तेच केलं, तेच पुढे करणार आहोत,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.
शिंदे यांनी थेट आणि परखड शब्दांत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. “निवडणूक आली की मराठी माणसाचा पुळका येतो, पण सत्तेत असताना मराठी माणसासाठी काहीच केलं नाही. दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटिक्स एवढाच यांचा अजेंडा होता,” असा घणाघात त्यांनी केला. 25 वर्षे महापालिकेत सत्ता असूनही मराठी माणसाला घर, रोजगार आणि सुरक्षित भवितव्य देण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत, “मराठी माणसाचं अस्तित्व धोक्यात नाही, पण तुमचं राजकारण नक्कीच धोक्यात आलं आहे,” असे ते म्हणाले.
मुंबईकरांना मुंबईबाहेर ढकलण्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करत शिंदे म्हणाले की, वसई-विरार, नालासोपारा, बदलापूर, अंबरनाथ, वांगणी येथे मुंबईकर का गेला, हे मुंबईकरांना माहीत आहे. महायुतीचा स्पष्ट संकल्प आहे की सन्मानाने मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकराला पुन्हा मुंबईत आणायचं, त्याला घर, रोजगार आणि मूलभूत सुविधा द्यायच्या. मुंबईवर महायुतीचाच झेंडा फडकणार आणि मुंबईचा महापौर हा मराठीच होणार असा पुनरुच्चार एकनाथ शिंदे यांनी केला.

मुंबईसाठी महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयांचा पाढा वाचताना शिंदे यांनी 20 हजार इमारतींना ओसी देण्याचा ऐतिहासिक निर्णय, भाडेमुक्त व झोपडपट्टीमुक्त मुंबईचा निर्णय, फनेल झोनमध्ये अडकलेला विकास मोकळा करण्याचा निर्णय, 17 मोठ्या झोपडपट्टी क्लस्टर योजनांना मंजुरी, खड्डेमुक्त मुंबईसाठी सर्व रस्ते काँक्रीटचे करण्याचा निर्णय, गिरणी कामगारांना दिलेली घरे आणि एमएमआरमध्ये आणखी एक लाख घरे देण्याची योजना यांचा उल्लेख केला.
“आमचं सरकार आल्यानंतर विकासाला लावलेले सगळे स्पीड ब्रेकर काढून टाकले,” असे सांगत शिंदे यांनी मेट्रो-3, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन आणि अटल सेतू या प्रकल्पांना दिलेल्या गतीचा उल्लेख केला. विकासविरोधी शक्तींनी हे प्रकल्प रोखून मुंबईकरांचे हाल केले आणि त्यातून 10 हजार कोटींचा अतिरिक्त खर्च वाढवला, असा आरोपही त्यांनी केला.
कोस्टल रोड नरिमन पॉइंट ते विरारपर्यंत नेण्याचा, वर्सोवा ते भाईंदर कनेक्टिव्हिटी, ईस्टर्न फ्रीवे ठाण्यापर्यंत वाढवण्याचा, ऑरेंज गेट ते नरिमन पॉइंट भुयारी रस्त्याचा, मीरा-भाईंदर–ठाणे रिंग रोडचा आणि वॉटर टॅक्सी, नवी मुंबई विमानतळ मेट्रो कनेक्शनचा उल्लेख करत शिंदे म्हणाले, “आम्ही मुंबई जोडतोय, तोडत नाही.”
पर्यावरण आणि जीवनमानावर भर देत शिंदे यांनी दीड वर्षांत एसटीपी प्रकल्प पूर्ण करून समुद्र प्रदूषण कमी करण्याचा निर्धार व्यक्त केला. महालक्ष्मी रेसकोर्स येथे 301 एकरचा सेंट्रल पार्क आणि कोस्टल रोडशी जोडलेला 170 अंडरपास उभारण्याचाही उल्लेख त्यांनी केला.
“त्यांचा अजेंडा करप्शन फर्स्ट होता, आमचा अजेंडा मुंबई फर्स्ट आहे,” असे ठामपणे सांगत शिंदे यांनी महायुती सरकार आल्यानंतर महाराष्ट्र पुन्हा एफडीआयमध्ये नंबर वन झाल्याचे सांगितले. मुंबईला फिनटेक कॅपिटल बनवण्याचा निर्धार असून, उद्योग, गुंतवणूक आणि रोजगार वाढवणे हेच आमचे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करताना शिंदे यांनी 1500 रुपये मदत, एसटीत 50 टक्के सवलत आणि 5 लाख रुपये बिनव्याजी कर्ज या निर्णयांची माहिती दिली आणि ही मदत रोखण्यासाठी विरोधक निवडणूक आयोगात गेले, असा आरोप केला. “लाडक्या बहिणींनी विधानसभेत 232 चा जोडा दाखवला, आता महापालिकेतही दाखवतील,” असा टोला त्यांनी लगावला.
सभेच्या शेवटी शिंदे यांनी थेट आवाहन करत सांगितले की, 15 तारखेला धनुष्यबाण आणि कमळ या चिन्हासमोर बटन दाबून महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा. “मुंबई महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार,” असा ठाम विश्वास व्यक्त करत त्यांनी भाषणाची सांगता केली.
या विराट सभेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम, भाजप नेते विनोद तावडे, आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम, माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यासह महायुतीचे अनेक खासदार, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने मुंबईकर उपस्थित होते.



