भारत निवडणूक आयोगाची कारवाई — ३३४ नोंदणीकृत पण मान्यता नसलेल्या पक्षांची नोंदणी रद्द

नवी दिल्ली : निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने (ECI) मोठी कारवाई करत ३३४ नोंदणीकृत पण मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची (RUPPs) नोंदणी रद्द केली आहे.
सध्याच्या घडीला देशात ६ राष्ट्रीय पक्ष, ६७ प्रादेशिक पक्ष आणि २,८५४ नोंदणीकृत मात्र मान्यता नसलेले राजकीय पक्ष अस्तित्वात होते. लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ च्या कलम २९अ नुसार पक्ष नोंदणीसाठी नाव, पत्ता, पदाधिकारी आदी माहिती देणे बंधनकारक आहे. तसेच सलग सहा वर्षे निवडणूक न लढवल्यास नोंदणी रद्द करण्याचा अधिकार आयोगाकडे आहे.
जून २०२५ मध्ये आयोगाने राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना ३४५ RUPPsची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. या प्रक्रियेत संबंधित पक्षांना नोटिसा पाठवून प्रत्यक्ष सुनावणीची संधी देण्यात आली. तपासणीनंतर ३३४ पक्षांनी आवश्यक अटी पूर्ण केल्या नसल्याचे स्पष्ट झाले, तर उर्वरित प्रकरणे पुनर्पडताळणीसाठी परत पाठविण्यात आली.
या कारवाईनंतर देशातील RUPPsची संख्या २,८५४ वरून २,५२० वर आली आहे. नोंदणी रद्द झालेल्या पक्षांना आता लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ मधील कलम २९ब व २९क, आयकर कायदा, १९६१ तसेच निवडणूक चिन्ह आदेश, १९६८ अंतर्गत कोणतेही लाभ मिळणार नाहीत. मात्र आयोगाच्या निर्णयाविरुद्ध ३० दिवसांच्या आत अपील करता येईल.
तपशीलवार यादीसाठी निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://www.eci.gov.in/list-of-political-parties) माहिती उपलब्ध आहे.