ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
“ऑपरेशन हथुनिया : १० फूट खोल पुरलेला ८९ कोटींचा विषारी खजिना जप्त”
“रायगड ते हथुनिया-राजस्थान : अमली तस्करीचा आंतरराज्यीय थरार”

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : महाड MIDC पोलिसांच्या कारवाईत काही दिवसांपूर्वी ८९ कोटी रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणात अटक केलेल्या चार आरोपींना तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली.
चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली — उर्वरित अमली पदार्थ राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यातील हथुनिया गावात पुरलेले आहेत. आरोपींनी स्पष्ट सांगितले की हा माल त्यांच्या साथीदाराने, सिद्दिक फिरोज खान याने, १० फूट खोल खड्डा खोदून लपवून ठेवला आहे.
महाड, अलिबाग, गुजरात आणि राजस्थान… चार ठिकाणच्या पोलिसांनी मिळून एक संयुक्त मोहिम आखली. पथकात पोसई सुदर्शन काजरोळकर (महाड शहर पोलीस ठाणे), पोना इक्बाल शेख (महाड MIDC), पोलीस शिपाई नारायण दराडे (महाड MIDC) आणि पोलीस शिपाई शितल बंडगर (महाड तालुका) यांचा समावेश होता.
राजस्थानमध्ये कारवाईदरम्यान पथकाने सिद्दिक फिरोज खानला ताब्यात घेतले. सुरुवातीला तो मौन बाळगून होता, पण कसून विचारपूस केल्यानंतर त्याने मान खाली घालून कबुली दिली —
“माल… मी पुरला आहे… दहा फूट खाली…”
संध्याकाळच्या अंधारात जेसीबीचा गर्जणारा आवाज, जमिनीचा तुकतुकीत वास, गावकऱ्यांच्या डोळ्यांत उत्सुकतेची आणि भीतीची लाट… आणि मग खड्ड्यातून बाहेर येतो — विषारी पॅकेटांचा थर. रायगडमधून राजस्थानपर्यंत गुपचूप गेलेला हा जीवघेणा खजिना अखेर पोलिसांच्या ताब्यात.
या आंतरराज्यीय कारवाईने रायगड पोलिसांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं — गुन्हेगार कुठेही पळो, न्यायाच्या हातापासून सुटका नाही.
विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी या शौर्यपूर्ण मोहिमेचं कौतुक करत पथकाचं अभिनंदन केल.
दरम्यान, ही मोहीम पोलीस अधीक्षक आचल दलाल (रायगड), अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे (रायगड) आणि पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे (स्थानीय गुन्हे शाखा, अलिबाग) यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली.