ताज्या बातम्यारायगड

प्रशासन झोपेत, जनता मृत्यूपंथावर – १७ जुलैला दुरशेतमध्ये जलसमाधी आंदोलन

जीवघेण्या रस्त्याविरोधात आरपारची लढाई


पेण : प्रशासनाच्या बेफिकिरीचा कळस झाल्यानंतर अखेर संतप्त दुरशेत ग्रामस्थांनी टोकाचा निर्णय घेतला आहे. रस्त्यावरील जीवघेण्या अवजड वाहनांची दहशत, अपघातांचे सत्र आणि प्रशासनाचे पाठबळ असलेल्या खाणधारकांच्या मक्तेदारीविरोधात आता ग्रामस्थ बाळगंगा नदीपात्रात १७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता मुलाबाळांसह सामूहिक जलसमाधी घेणार आहेत. तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी आणि मुख्य सचिवांकडे तक्रारी, रस्ता रोको आंदोलन, बैठका, लेखी आश्वासने… या सगळ्याचा निष्फळ खेळ ग्रामस्थांनी अनुभवला आहे – आता आरपारची लढाई सुरू झाली आहे!

पेण तालुक्यातील दुरशेत रस्ता अवजड डंपरच्या ओव्हरलोडेड रहदारीमुळे अक्षरश: मृत्यूचा सापळा बनला आहे. सांकशी किल्ल्याजवळील बेलवडे आणि मुंगोशी येथून खाणीतून उत्खनन केलेल्या दगडांची वाहतूक दररोज ३०० ते ४०० ओव्हरलोडेड डंपरद्वारे केली जाते. यातून निर्माण झालेला धूळकण, अपघातांचा धोका, आणि विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच जीव मुठीत धरून या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. तरीही महसूल आणि वाहतूक विभागाने या वाहनांवर कोणतीही कठोर कारवाई केलेली नाही.

ग्रामस्थांनी दिनांक १७ जून २०२५ रोजी रास्ता रोको आंदोलन करत तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्याकडून लेखी आश्वासन घेतले होते की १५ दिवसांत पर्यायी रस्ता तयार केला जाईल. त्यानंतर आमदार रवीशेठ पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होऊनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. उलटपक्षी, ३ जुलै रोजी रात्री जे.एस.डब्ल्यू कंपनीचा स्लॅग बाळगंगा नदीपात्रात टाकून परस्पर अनधिकृत रस्ता तयार करण्याचा घृणास्पद प्रयत्न केला गेला — ना ग्रामस्थांना माहिती, ना प्रशासनाकडून विरोध!

या अनधिकृत रस्त्यामुळे नदीपात्र अरुंद होऊन दुरशेतसह आजूबाजूच्या गावांना महापुराचा धोका निर्माण झाला आहे. हजारो हेक्टर शेती उद्ध्वस्त होण्याची शक्यता असूनही, प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे.

या पाशवी निष्काळजीपणाच्या विरोधात आणि भयमुक्त, सुरक्षित रस्त्यासाठी दुरशेत ग्रामस्थांनी आता ‘करो या मरो’चा पवित्रा घेतला आहे. १७ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता दुरशेत येथील बाळगंगा नदीपात्रात सामूहिक जलसमाधी घेतली जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते उदय गावंड, मिलिंद गावंड, अजय भोईर, सुरज भोईर, नितेश डंगर व इतर ग्रामस्थांनी दिला आहे.

> हा लढा केवळ रस्त्याचा नाही, हा लढा हक्काचा आहे — आणि आता शेकडो ग्रामस्थ जीवाची बाजी लावून न्याय मिळवण्यासाठी उभे ठाकले आहेत!


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button