ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

प्रशासकीय राजवट खालसा होणार ! 12 मार्चला शिवतीर्थावर लोकशाहीचे राज्य 

अलिबाग येथील नियोजन भवनाच्या सभागृहात नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांची विशेष बैठक; विकासकामांचा आढावा घेऊन ‘हिशेब’ मांडणार का नवे सत्ताधारी?


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

अलिबाग  |

रायगड जिल्हा परिषदेसाठी 12 मार्च रोजी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड होणार असून गेली साडेतीन वर्षे शिवतीर्थावर बसलेली प्रशासनाची राजवट अखेर खालसा होणार आहे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आता जिल्हा परिषदेत नव्या सत्ताधाऱ्यांची अधिकृत एंट्री होणार असून सत्तेचा कारभार पुन्हा जनतेच्या प्रतिनिधींच्या हाती जाणार आहे.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 12 मार्च रोजी अलिबाग येथील नियोजन भवनाच्या सभागृहात नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. याच बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पडणार आहे.
रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक 7 फेब्रुवारी रोजी पार पडली होती. त्यानंतर 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाले. मात्र त्यानंतर अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया प्रलंबित होती. ग्रामविकास विभागाने 20 मार्चपूर्वी पहिली बैठक घेऊन निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिल्यानंतर आता हालचालींना वेग आला आहे.
असा असेल निवड कार्यक्रम
12 मार्च : सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत नामनिर्देशन अर्ज दाखल. दुपारी 2 वाजता अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष बैठकी चे आयोजन करण्यात येणार आहे.
सत्तेच्या गणितांबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात सत्तास्थापनेबाबत सकारात्मक हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. तर शिवसेना शिंदे गट विरोधी बाकांवर बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अधिकृत घोषणा मात्र बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्यातील 15 पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती निवडीचाही कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यासाठी 11 मार्च रोजी संबंधित पंचायत समित्यांमध्ये विशेष सभा घेण्यात येणार आहेत.
साडेतीन वर्षांनंतर जिल्हा परिषदेत पुन्हा राजकीय नेतृत्वाची स्थापना होत असल्याने जिल्ह्यातील राजकारणात नवा अध्याय सुरू होणार आहे. आता अध्यक्षपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते आणि जिल्हा परिषदेचा कारभार कोणाच्या नेतृत्वाखाली पुढे जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या साडेतीन वर्षांच्या कालावधीत प्रशासकीय कारभारात विकासकामांबाबत कोणते निर्णय घेण्यात आले, विविध योजनांसाठी किती निधी मंजूर झाला आणि त्याचा प्रत्यक्षात कसा विनियोग करण्यात आला, याचा आढावा नव्या सत्ताधाऱ्यांकडून घेतला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या कालावधीत ग्रामीण भागाच्या विकासासाठी राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्याचप्रमाणे जिल्हा नियोजन समितीमार्फतही मोठ्या प्रमाणावर निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आला होता. त्यामुळे या निधीचा वापर कोणत्या योजनांवर, कोणत्या कामांसाठी आणि किती प्रमाणात झाला, याची सविस्तर छाननी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नव्या नेतृत्वाकडून प्रशासकीय काळातील निर्णयप्रक्रिया, खर्चाची पारदर्शकता आणि कामांची गुणवत्ता यावरही प्रकाश टाकला जाऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
…..
रायगड जिल्हा परिषद पक्षीय बलाबल (59)
…….
शिवसेना (शिंदे गट) ……………. 21
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) … 16
भाजप …………………………. 15
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) …. 05
काँग्रेस ………………………. 02
————

Related Articles

Back to top button