ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
“प्रदूषणाच्या बोगस पाट्याखाली शेकापची सत्ता डळमळली – जनतेच्या मनात शिवसेना, शेकाप मात्र पूर्वजांच्या कुबड्यांवर!”
"जेएसडब्ल्यू प्रकल्पावरून रायगडमध्ये सोशल मीडियावर पेटला शिवसेना विरुद्ध शेकाप संघर्ष; राजा केणींचा थेट सवाल – पूर्वजांच्या नावावर किती दिवस जगणार? स्वतःचं काम दाखवा!"

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : जिल्ह्यात जेएसडब्ल्यू कंपनीच्या विस्तारीकरणावरून पेटलेल्या वादात शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणींनी शेकापवर थेट हल्ला चढवला आहे.
“पूर्वजांच्या कुबड्या घेऊन किती दिवस धिंडोरे पिटणार? स्वतःच्या नावावर काय कामं केलीत ते दाखवा!” असा फटकारा मारत केणींनी सोशल मीडियावरून शेकापचा अक्षरशः फडशा पाडल्याचे दिसून येते.
केणींनी थेट आरोप केला की –
“शेकापला राजेशाहीत रमण्याची सवय आहे. लोकांवर रोब दाखवायचा, कार्यकर्त्यांना नोकरासारखं वागवायचं, उपकाराच्या बदल्यात गडी म्हणून राबवायचं – हा त्यांच्या डीएनएमधलाच भाग आहे. पण सत्ता हातातून गेल्यावर आता तुम्ही रस्त्यावर आलात. म्हणूनच प्रदूषणाचा मुद्दा उचलून शेवटचे पंख फडफडवताय.” 

ते म्हणाले –
“नारायण नागू पाटील, प्रभाकर पाटील, ॲड. दत्ता पाटील यांचं काम आम्हालाही माहीत आहे आणि आम्ही त्यांना मान देतो. पण तिसरी-चौथी पिढी आली तरी अजूनही त्यांच्या नावावर जगणार आहात का? तुमच्याच काळात रोजगार दिला पण त्याच लोकांना गुलाम बनवलं, घरगडी केलं, कर्जाच्या खाईत ढकललं. आज त्यांचीच मुलं तुमच्या जाचाला कंटाळून आमच्यासोबत उभी आहेत.”
औद्योगिकीकरणाच्या मुद्द्यावरून केणींनी शेकापचा अजून समाचार घेतला –
“फक्त प्रदूषण प्रदूषण करून जनता भुलवू नका. आम्ही कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करून Pollution Control Technology, Green Belt, Zero Liquid Discharge, ETP, Bag Filters, Sound Barriers अशा उपाययोजना निश्चित करूनच पाठिंबा दिला आहे. गावं प्रगत व्हावीत, तरुणांना रोजगार मिळावा, बाजारपेठांना चालना मिळावी, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा – हेच खरे मुद्दे आहेत. पण शेकापला हे समजायचं नाही.”
त्यांनी स्पष्ट धमकीही दिली –
“सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलो. पण शेकापची सत्ता उलथवून लावण्याची धमक आमच्यात आहे. लोकांच्या डोक्यात नाही, मनात आम्ही राज्य करतो. रोजगार मिळवून देण्यासाठी मी स्थानिक तरुणांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.”
दरम्यान, शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणींच्या या आक्रमक बॉम्बफेकीनंतरही शेकापकडून अजून प्रतिक्रिया आलेली नाही. शेकाप याला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे l मात्र, सोशल मीडियावर पेटलेला हा शिवसेना विरुद्ध शेकाप संघर्ष आता रायगडच्या राजकारणात महाभडका उडवणार हे नक्की.
…..
सोशल मीडिया रिऍक्शन बॉक्स
राजा केणींच्या आक्रमक भूमिकेला सोशल मीडियावर तुफानी प्रतिसाद!
शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी शेकापवर चढवलेल्या हल्ल्याला नेटिझन्सकडून भरघोस दाद मिळत आहे. फेसबुकपासून ते व्हॉट्सअॅप ग्रुप्सपर्यंत सर्वत्र केणींच्या पोस्ट्स व्हायरल झाल्या आहेत. तरुण वर्गाने उघडपणे पाठिंबा दर्शवला असून “हेच खरं नेतृत्व”, “शेकापला सडेतोड उत्तर” अशा कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे.



