“प्रदूषणमुक्त JSW प्रकल्पाला शिवसेनेची साथ; रोजगार नसेल तर लढा”
शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांची पत्रकार परिषदेत माहिती

रायगड : जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात नावाजलेली JSW कंपनी आता फेज-3 प्रकल्प उभारणार असून, २२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या जनसुनावणीला शिवसेनेचा पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती देत, “प्रकल्प प्रदूषणमुक्त असावा आणि प्रथम स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळालाच पाहिजे, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल” असा स्पष्ट इशारा दिला.
राजा केणी म्हणाले, “हा प्रकल्प गॅसवर चालणारा असल्याने प्रदूषणाचा धोका नाही, असे कंपनीने आश्वासन दिले आहे. कोक प्लांट येणार आणि प्रदूषण होणार, असा संभ्रम जनतेमध्ये पसरवला जात आहे, तो चुकीचा आहे.” याकडे त्यांनी लक्ष वेधले.
ते पुढे म्हणाले, “हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल. भरती प्रक्रियेत १५ किमी परिसरातील तरुणांना प्राधान्य, त्यानंतर रायगडमधील इतर स्थानिक भूमिपुत्रांना संधी दिली पाहिजे. परप्रांतीयांची भरती झाल्यास ती रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील.”
स्थानिकांच्या रोजगाराच्या हक्कासाठी शिवसेना कंपनीसोबत आहे, असेही केणी यांनी ठामपणे सांगितले.पत्रकार परिषदेस युवा सेना जिल्हाप्रमुख संजय म्हात्रे, पेण तालुका प्रमुख तुषार मानकवळे, उत्तम पाटील, जीवन पाटील, संकेत पाटील आणि शिवसैनिक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.